![]()
मराठवाडा मित्र परिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “आदर्श माता-पिता पुरस्कार वितरण सोहळा २०२६” या भव्य कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाडा रत्नांच्या माता-पित्यांचा सन्मान करण्यात आला. उर्मिलाताई कराड सभागृह, एमआयटी कॉलेज, लोणी काळभोर (पुणे) येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात श्रीमंत युवराज संभाजीराजे शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार सचिव, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य हे होते. यावेळी श्रीकांत डिसले (अपर पोलीस अधीक्षक, पुणे), श्रीकांत शेळके, प्रा. डॉ. महेश थोरवे आणि अॅड. अमोल पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सामाजिक, प्रशासकीय, पत्रकारिता, उद्योग, वैद्यकीय, साहित्य व लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या माता-पित्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये डॉ. ज्योती मेटे, विक्रम गायकवाड, दीपक आकडे, राहुल कुलकर्णी, अनंत बिरादार, रामचंद्र पवार, सुरेश झांबरे, मंगेश चिवटे, शरद तांदळे, डॉ. भास्कर पाटील आणि कृष्णाई उळेकर यांच्या माता-पित्यांना आदर्श माता-पिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघर्षमय परिस्थितीत मुलांना शिक्षण, संस्कार आणि जीवनमूल्यांची शिकवण देऊन त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचविणाऱ्या कर्तृत्ववान माता-पित्यांचा गौरव करताना सभागृहात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पोलीस निरीक्षक सुरेश जायभाय लिखित लाल पाणी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन रविराज पाटील, महेश टेळेपाटील, शरद दताळ, राजेंद्र नारायणपूरे, किशोर पाटील, दत्ता भांडवलकर, रणजीत गोदामगावे, दत्तात्रय राठोडे, मुरलीधर पवार, विठ्ठल चव्हाण, अरुण पवार, राजेंद्र हाजगुडे आदींनी केले. मराठवाड्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
Source link
मराठवाडा रत्नांच्या माता-पित्यांचा सन्मान:पुण्यात मराठवाडा मित्र परिवार, प्रतिष्ठानतर्फे भव्य सोहळा संपन्न