![]()
शेतकऱ्यांची बियाणांवरील खर्चात बचत व्हावी, यासाठी स्वउत्पादित सोयाबीन बियाण्यांचा येत्या खरीप हंगामामध्ये उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील आसरखेडे येथे सहाय्यक कृषी अधिकारी रोमा आहेर यांनी सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सोयाबीन हे पीक स्वपरागसिंचित असून, या पिकाचे बियाणे सरळ वाणाचे आहे, त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. सोयाबीनच्या सलग पेरणीसाठी प्रतिएकर २६ किलो बियाणे, रुंद सरी वरंबा यंत्राने (बीबीएफ) पेरणी केल्यास प्रतिएकर २२ किलो बियाणे व टोकन पद्धतीने पेरणी केल्यास प्रतिएकर १२ ते १४ किलो बियाणे आवश्यक असल्याबाबत सांगण्यात आले. शेतकरी बांधवांनी स्वतःकडील सोयाबीन बियाणांची घरच्या घरी उगवण क्षमता तपासून पेरणीसाठी किती बियाणांचा वापर करावा, याबाबत रोमा आहेर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दशपर्णी अर्क, जीवामृत, बिजामृत बनविण्याचे प्रात्यक्षिक करून वापरासंबंधी माहितीही देण्यात आली. बियाणे पेरणीसाठी असे ओळखावे कागद अथवा पोते पाण्याने ओले करून त्यावर १० रांगांमध्ये प्रत्येकी १० बिया याप्रमाणे एकूण १०० बिया ठेवाव्यात व त्याची गुंडाळी करून तीन-चार दिवस त्यावर पाणी शिंपडावे. १०० बियांपैकी ७० सुदृढ व निरोगी बियांना मोड आलेले असल्यास ते बियाणे पेरणीसाठी योग्य आहे . किमान ७० टक्के अथवा त्यापुढे उगवणक्षमता असेल तर पेरणीसाठी एकरी सरासरी २६ किलो बियाणे वापरावे. यानंतर ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवण झाली असेल तर प्रत्येक १ टक्का उगवणक्षमता घटसाठी ३७० ग्रॅम जास्तीचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. समजा ६९% बियाण्यांची उगवण झाली असेल तर एकरी २६.३७ किलो, ६८% बियाण्यांची उगवण झाली असेल तर २६.७४ किलो बियाणे, ६०% बियाण्याची उगवण झाली असेल तर २९.७० किलो याप्रमाणे बियाणे वापरावे. ६० टक्क्यांपेक्षा कमी उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरू नये, असे मार्गदर्शन सहाय्यक कृषी अधिकारी रोमा आहेर यांनी केले.
Source link
सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणेच वापरावे:आसरखेडेत सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक