Headlines

नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्टसाठी मुद्रांक शुल्क माफ:गोदणी-लाडगावातील जमीन खरेदी सुकर, कनेक्टिव्हिटी वाढणार




हिंगणा तालुक्यातील गोदणी (रीठी) आणि लाडगाव (रीठी) येथे प्रस्तावित ‘नवीन नागपूर बिझनेस डिस्ट्रिक्ट’ प्रकल्पाला राज्य सरकारने गती दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जमीन संपादनाचा मार्ग सुकर होऊन प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येणार आहे. नवीन बाह्य वळण रस्त्यामुळे या भागाची कनेक्टिव्हिटीही वाढणार आहे. सुमारे ११ हजार ३०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (NMPDA) ६९२.०६ हेक्टर जमिनीचे संपादन केले जात आहे. यात लाडगाव आणि गोदणी येथील ६२९.४३ हेक्टर खाजगी जमीन शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोबदला निश्चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, जमीन संपादनाचा खर्च ४ हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधांवर ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले जाणार असून, यासाठी ‘हुडको’कडून कर्ज उभारले जात आहे. ‘एनबीसीसी’ ही राष्ट्रीय स्तरावरील कंपनी सल्लागार म्हणून काम करत आहे. नवीन बाह्य वळण रस्ता आणि समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या या प्रकल्पामुळे गोदणी, लाडगाव, देवळी आणि गुमगाव परिसरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. हे क्षेत्र भविष्यात विदर्भाचे आर्थिक केंद्र म्हणून उदयास येईल. येथे अत्याधुनिक आयटी हब, कॉर्पोरेट पार्क, स्टार्टअप इकोसिस्टम आणि ‘प्लग अँड प्ले’ मॉडेलवर आधारित पायाभूत सुविधा विकसित केल्या जातील. या प्रकल्पातून सुमारे ५ लाख नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासनाला जमिनीचा ताबा घेणे आणि विकासकामांची अंमलबजावणी करणे अधिक सोपे झाले असून, ‘ग्लोबल नागपूर’चे स्वप्न प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *