![]()
मुंबईतील चारकोप पोलिसांनी कांदिवलीत झालेल्या एका मोठ्या सोने चोरीप्रकरणी उल्लेखनीय कामगिरी करत जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना अटक केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेलगत असलेल्या पुंछ जिल्ह्यातून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या धडक कारवाईमुळे आंतरराज्यीय स्तरावर पळून गेलेल्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांचे कसब पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चोरीच्या घटनेची सविस्तर माहिती अशी की, कांदिवलीतील एका दागिन्यांच्या निर्मिती युनिटमधून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. या गुन्ह्याचा सखोल तपास करत पोलिसांनी तब्बल 64 लाख 95 हजार रुपये किमतीच्या 433 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे, आरोपींनी हा मौल्यवान मुद्देमाल जम्मू-काश्मीरमधील एका उंच डोंगरावर जमिनीत पुरून ठेवला होता, जो पोलिसांनी अत्यंत शिताफीने हस्तगत केला. मोबाईल बंद करून थेट जम्मू-काश्मीर गाठले गुन्हा केल्यानंतर आरोपींनी स्वतःचे मोबाईल फोन बंद केले आणि थेट जम्मू-काश्मीरमध्ये पळ काढला. तिथेच एका सुरक्षित ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला होता. मात्र, चारकोप पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि स्थानिक हत्यारबंद पोलिसांच्या मदतीने या आरोपींचा अचूक माग काढला आणि त्यांना बेड्या ठोकल्या. या गुन्ह्यात सामील असलेल्या आणखी एका फरार आरोपीचा सध्या पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. सुरक्षारक्षकांनीच चोरले तब्बल 5.28 कोटींचे दागिने या चोरीमागील पार्श्वभूमी अशी की, गुरुवारी रात्री कांदिवलीतील संबंधित दागिन्यांच्या निर्मिती युनिटमध्ये काम करणारे तीन सुरक्षारक्षक तब्बल 5.28 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह पसार झाले होते. पळून जाण्यापूर्वी त्यांनी ‘पगार थकल्यामुळे आपण नोकरी सोडत आहोत’, असा बनावट मेसेज व्हॉट्सॲपवरून मालकाला पाठवला होता. मोहम्मद सफिर ऊर्फ मोहम्मद अहमद, विकास आणि शहबाज गुर्जर अशी या आरोपींची ओळख पटली असून, हे तिघेही याच युनिटमध्ये कामाला होते.
Source link
कांदिवली सोने चोरी प्रकरण:मोबाईल बंद करून पळालेल्या आरोपींना पाकिस्तान सीमेवर अटक; चारकोप पोलिसांच्या तपासाचे सर्वत्र कौतुक