![]()
वारकरी संप्रदायाचा जयघोष करत आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरत निघोज येथील श्रद्धास्थान असलेल्या वैकुंठवासी रामदास बाबा महाराज दुसाणे पायी दिंडी सोहळ्याने पंढरपूरकडे कूच केली. खांद्यावर भगव्या पताका घेऊन भजनाच्या सुरात नाचणारे शेकडो वारकरी आणि माता-भगिनींमुळे संपूर्ण निघोज नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. दिंडीच्या प्रस्थानानिमित्त सर्वप्रथम रामदास बाबा दुसाणे महाराज पर्णकुटीत दिंडी प्रमुख भाऊसाहेब कोल्हे मामा व चंद्रभागा कोल्हे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यावेळी डॉ. भास्करराव शिरोळे, डॉ. पांडुरंग थोरात, नानापाटील लंके, भगवान लामखडे आदींनी बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. येथून निघालेला हा भक्तांचा मेळा मळगंगा मंदिरात पोहोचला. मातेचे दर्शन घेऊन महिला भाविकांनी विठू माऊली आणि मळगंगा मातेचा गजर करत मंदिरात फेर धरला. पारनेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिंडी प्रमुख भाऊसाहेब कोल्हे यांच्यासह रंगनाथ ढवण, पोपट कळमोडे, सुखदेव वाव्हळ, हौशीराम शेटे व भरत ढवळे यांचा सत्कार केला. वारीच्या सुविधेसाठी संचालिका मंगल लामखडे व लामखडे वस्तीच्या वतीने वारकऱ्यांना १०० स्टीलच्या ताटांची भेट देण्यात आली. निघोज पंचक्रोशीतून दरवर्षी ६ दिंड्या पंढरपूरला जातात. रामदास बाबांनी पेरलेले भक्तीचे बीज भाऊसाहेब कोल्हे आणि त्यांचे सहकारी निष्ठेने पुढे चालवत आहेत, असे डॉ. शिरोळे यांनी सांगितले. चाळीस वर्षांपूर्वी निघोजमध्ये आलेल्या रामदास बाबांचे मूळ गाव कोणते, हे आजही गूढ आहे. मात्र, कोल्हे परिवाराने केलेल्या सेवेतून येथे भक्तीचा मोठा मळा फुलला.
Source link
टाळ-मृदंगाचा कडकडाट, अन् भगव्या पताकांचा थाट:निघोजमधून रामदास बाबा दुसाणे माऊलींच्या दिंडीचे प्रस्थान