![]()
अमरावती शहरात जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका वृद्ध महिलेचा जीव वाचला. वार्ड क्रमांक १९ मधील स्वस्तिक नगर परिसरात जनगणना सुरू असताना ही घटना घडली. या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावती महानगरपालिकेकडून संबंधित कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जनगणना कर्मचारी स्वस्तिक नगर परिसरात घरोघरी माहिती संकलित करत होते. त्यावेळी एका घरात एक वृद्ध महिला गंभीर अवस्थेत आढळली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत मदतकार्य सुरू केले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. जनगणना कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे आणि मानवतावादी भूमिकेमुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते जनगणना कर्मचारी वैशाली प्रशांत नालसे (प्रगणक), केशव नरेंद्र पंचारिया (पर्यवेक्षक) आणि मनोज नेताजी वाकोडे (प्रगणक) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनगणना विभागाचे उपमहानिबंधक यशवंत पाटील, मनपा उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे आणि कैलाश कुलट यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना आयुक्त वर्षा लड्डा म्हणाल्या, “जनगणना ही एक महत्त्वाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. हे काम करत असताना कर्मचाऱ्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता प्रशंसनीय आहे. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या मदतीला धावून जाणे ही अभिमानास्पद बाब आहे.” या घटनेमुळे जनगणना मोहिमेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून त्यांच्या कार्याची शहरभर चर्चा होत आहे.
Source link
जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वृद्ध महिलेचा जीव वाचला:अमरावती आयुक्तांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार