![]()
आधुनिक जगातील युद्ध आता केवळ आमनेसामनेची पारंपरिक लढाई राहिलेले नाही. ते पूर्णपणे ‘रोबोटिक’ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित झाले आहे. अशा बदलत्या युद्धभूमीवर भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी नागपूरची ‘सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड’ कंपनी संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवून आणत आहे. गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ज्या स्वदेशी वेपनाइज्ड (सशस्त्र) ड्रोन ‘नागास्त्र’च्या मदतीने भारतीय सैन्याने पाकिस्तानचा डाव उधळून लावला, त्याची निर्मिती याच कंपनीने केली. भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आता देशाच्या सीमांवर उणे -40 अंशाच्या गोठवणाऱ्या तापमानात तैनात होणारा ‘वेपनाइज्ड डॉग रोबोट’, मानवासारखा दिसणारा ‘ह्युमनॉइड रोबोट’ आणि मायक्रो मिसाइलवर आधारित अँटी-ड्रोन सिस्टीम ‘भार्गवास्त्र’ या अत्यंत संवेदनशील आणि अत्याधुनिक स्वदेशी प्रकल्पांवर काम सुरू आहे, अशी माहिती “सोलर इंडस्ट्रीज’चे संस्थापक आणि चेअरमन पद्मश्री सत्यनारायण नुवाल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. जगातील हाय एनर्जी मटेरियल आणि प्रोपेलेंटमध्ये भारताला अमेरिका, इस्रायल, जर्मनीसारख्या देशांच्या बरोबरीने उभे करणाऱ्या नुवाल यांच्याशी साधलेला हा थेट आणि विशेष संवाद… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते की ‘ऑपरेशन सिंदूर मध्ये तुमच्याकडे तयार झालेले ‘नागास्त्र’ आणि लॉइटरिंग म्युनिशनचा वापर झाला, याबद्दल काही सांगाल का? नुवाल : 2020 मध्ये अझरबैजान आणि आर्मेनिया युद्धातील ड्रोनच्या वापरामुळे पारंपरिक युद्धाचे स्वरूपच बदलून गेले. जगासमोर शस्त्रास्त्रांचे अगदी नवीन रूप समोर आले. आम्हीसुद्धा 2020 नंतर अनमॅन्ड एरियल सिस्टीम बनवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांच्या मेहनतीनंतर आम्ही देशातील पहिले वेपनाइज्ड (सशस्त्र) ड्रोन ‘नागास्त्र-1’ बनवले, ज्याचा आपल्या सैन्याला पुरवठा केला गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये याचा अचूक वापर होणे ही मी केवळ दैवी शक्तीची कृपा मानतो. नागास्त्र-1 ची रेंज 15 किलोमीटर असून 1 तास उडण्याची त्याची क्षमता आहे. यानंतर आम्ही नागास्त्र-1 ए, नागास्त्र-1 बी आणि नागास्त्र-2 सह इतर व्हेरिएंट्स तयार केले आहेत. यांना ‘कामिकेझ ड्रोन’ किंवा ‘सुसाईड ड्रोन’ असेही म्हटले जाते. हे लक्ष्यावरून (टार्गेट) बराच वेळ घिरट्या घालू शकते, शत्रूंचा शोध घेऊ शकते आणि अचूक संकेत मिळताच स्फोटक वॉरहेडसह त्यावर थेट धडकून हल्ला करू शकते. आम्ही सैन्याला याचा पुरवठाही सुरू केला आहे. यांची क्षमता 25 ते 50 किलोमीटर आहे आणि यामध्ये 1 ते 5 किलोपर्यंतचा दारूगोळा बसवला जाऊ शकतो. याशिवाय याचे तंत्रज्ञानही खूप विकसित केले आहे. अहिल्यानगर-संभाजीनगर डिफेन्स कॉरिडॉरवरही वेगाने काम सुरू आहे. त्याबद्दल तुमचे काय मत आहे? नुवाल : डिफेन्स कॉरिडॉरबाबत जर कुणी सर्वात जास्त प्रॅक्टिकल आणि अॅग्रेसिव्ह असेल, तर ते महाराष्ट्र सरकारच आहे. ज्या प्रकारे सिस्टिमॅटिक पद्धतीने डिफेन्स कॉरिडॉरचे काम सुरू आहे, त्यामुळे इथला डिफेन्स कॉरिडॉर सर्वात जास्त यशस्वी होईल यात मला कोणतीही शंका नाही. महाराष्ट्राला भौगोलिक स्थानाचा फायदा आहे, जो डिफेन्स सेक्टरसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. दुसरे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्हिजनरी पॉलिसी याला वेगाने पुढे नेत आहे. निश्चितपणे मला असे वाटते की जितके डिफेन्स कॉरिडॉर पाच-सात वर्षांपूर्वी आले किंवा जे आता येत आहेत, त्या सर्वांमध्ये महाराष्ट्राचा डिफेन्स कॉरिडॉर खूप वेगाने पुढे जाईल. या ड्रोन्समध्ये स्वार्म टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे का? यावर सध्या काय परिस्थिती आहे? नुवाल : स्वार्म ड्रोन सध्या अंडर-डेव्हलपमेंट आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी तिकडून आलेल्या छोट्या-छोट्या ड्रोन्सना उत्तर देण्यासाठी आमच्या मोठ्या ड्रोन्सचा वापर करण्यात आला होता. यानंतर आम्ही काउंटर ड्रोन सिस्टीम म्हणून मायक्रो मिसाइलवर आधारित ‘भार्गवास्त्र’ डेव्हलप केले आहे. हे 10 किलोमीटरपर्यंत पाहू शकते आणि 2.5 किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या कोणत्याही बाहेरील ड्रोन किंवा यूएव्हीला पाडण्याची क्षमता यात आहे. याची वेगवेगळ्या रेंजमध्ये ट्रायल टेस्टिंग झाली आहे. स्वार्म : हा लहान आणि ऑटोनोमस ड्रोन्सचा एक नेटवर्क असतो, जे एआय आणि अॅडव्हान्स सॉफ्टवेअर अल्गोरिदमच्या मदतीने एकत्र काम करतात. थव्याच्या स्वरूपात असल्यामुळे, हे एकाच वेळी शेकडोच्या संख्येने शत्रूची एअर डिफेन्स सिस्टीम, रडार किंवा तळांना लक्ष्य करतात. या झुंडीतील वेगवेगळ्या ड्रोन्सना वेगवेगळी कामे सोपवली जाऊ शकतात; जसे की काही हेरगिरी करतात, काही इलेक्ट्रॉनिक जॅमिंग करतात, तर काही थेट हल्ला करतात. तुम्ही आता ‘ब्रह्मोस’ देखील देशातच बनवत आहात का? या दिशेने काय डेव्हलपमेंट झाले आहे? नुवाल : एक वर्षापूर्वीपर्यंत ब्रह्मोसचा संपूर्ण बूस्टर आणि रॉकेट सिस्टीम रशियाकडून इम्पोर्ट (आयात) केली जात होती. आम्ही डीआरडीओच्या सपोर्टने हे आमच्याकडे डेव्हलप केले आहे. रशियाचे शास्त्रज्ञही इथे आले होते, पाच दिवस इथे राहून त्यांनी आमच्या सिस्टीमला मंजुरी दिली आहे. आता आम्ही 100 रॉकेट्स तयार केले आहेत; याशिवाय याचे वॉरहेड देखील बनवले असून सध्या त्यांची टेस्टिंग सुरू आहे. भारतात ‘स्वदेशी विरुद्ध इम्पोर्टेड’ या मानसिकतेत बदल झाला आहे का? नुवाल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजनमुळे गेल्या काही वर्षांत सरकारच्या विचारात मोठा बदल झाला आहे. पॉलिसी खूप चांगली बनवली गेली आहे. परंतु, पॉलिसी लागू करणाऱ्या सिस्टीममध्ये अजून खूप काम करण्याची गरज आहे. फक्त धोरणे चांगली असून चालणार नाही, तर अकाउंटेबिलिटी आणि मॉनिटरिंग सिस्टीम मजबूत असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत पोलंड, स्वीडन, डेन्मार्क आणि फ्रान्ससारखे देश आपल्यापेक्षा पुढे आहेत. तिथे काम करणारे 50 टक्क्यांहून अधिक लोक भारतीयच आहेत. आपल्याकडे ज्या संधी मिळायला हव्या होत्या, त्या काही कारणांमुळे मिळाल्या नाहीत. जगभरात एआय आणि रोबोटिक्सचा वापर वाढला आहे. आपण यासाठी तयार आहोत का? नुवाल : अझरबैजान आणि आर्मेनियाच्या 2020 मधील युद्धानंतर रशिया-युक्रेन आणि इराण-इस्रायल युद्धात अनमॅन्ड एरियल सिस्टीम आणि लॉंग रेंज मिसाईल्सचा सर्वाधिक वापर झाला आहे. येणाऱ्या काळात एआय आणि रोबोट्सचे महत्त्व वाढणार आहे. यामध्ये अचूकता आणि परवडणारी किंमत हे महत्त्वाचे असते. मला असे वाटते की तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण खूप मागे आहोत. या दिशेने बरेच काही करण्याची गरज आहे. संरक्षण खरेदी धोरण 2026 मध्ये या दिशेने बरेच काही करण्यात आले आहे. मी इतकेच सांगू शकतो की आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत. एआय आणि रोबोट्सबाबत तुमच्याकडे काय कामे होत आहेत? नुवाल : आम्ही बरेच काही काम केले आहे आणि करत आहोत. नागपूरच्या मिहान एसईझेड मध्ये आम्हाला पझेशन लेटर मिळाले आहे. आम्हाला काही परवानग्यांची प्रतीक्षा आहे, ज्या दोन-तीन महिन्यांत मिळतील. तीन-चार महिन्यांत आम्ही आपले काम सुरू करू. आज आमच्या जवानांना उणे 40 (-40) अंश सेल्सिअस तापमानात तैनात राहावे लागते. सर्व्हिलन्स आणि सिक्युरिटी अधिक चांगली करण्यासाठी आम्ही एका वर्षाच्या आत देशातील पहिला वेपनाइज्ड रोबोट बनवू. आम्ही डॉग रोबोटचा प्रोटोटाइप बनवत आहोत. यानंतर दोन-तीन महिन्यांत आम्ही ह्युमनॉइड (मानवासारखा दिसणारा रोबोट) तयार करू. दारूगोळ्याच्या बाबतीत आपल्या आत्मनिर्भरतेची पातळी सध्या काय आहे? नुवाल : हाय एनर्जी मटेरियल आणि प्रोपेलेंटच्या बाबतीत आम्ही ग्लोबल लेव्हलच्या बरोबरीचे आहोत. जे मटेरियल पूर्वी आमच्याकडे 100% इम्पोर्ट व्हायचे, आज आम्ही त्याचे 70% पेक्षा जास्त मटेरियल यूएस, इस्रायल, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना एक्सपोर्ट (निर्यात) करत आहोत. तुम्ही पिनाकाव्यतिरिक्तही रॉकेट टेक्नॉलॉजीवर काम करत आहात का? नुवाल : सध्याचे पिनाका रॉकेट 75 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करू शकते. आम्ही सैन्याला याची रेंज वाढवून 300 किमी करण्याचा एक प्रस्ताव दिला आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही लवकरच यातही यश मिळवू. यासाठी आमची भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. चंद्रपूरमधील एक्सप्लोसिव्ह लायसन्स घेण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास कसा राहिला? नुवाल : मी वयाच्या 17 व्या वर्षापासूनच माझा व्यवसाय सुरू केला होता. राजस्थानमधील भिलवाडा येथे माझा जन्म झाला, तिथून मी बल्लारशाहला आलो. तिथेही दोन वर्षे संघर्ष केला. काही जमले नाही म्हणून मी चंद्रपूरला आलो. चंद्रपूरमध्ये अब्दुल सत्तार अल्लाह भाई नावाचे एक गृहस्थ होते, ज्यांच्याकडे एक्सप्लोसिव्हची मॅगझिन (लायसन्स) होती. मी त्यांच्याकडून ती मॅगझिन भाड्याने घेऊन माझ्या करिअरची सुरुवात केली. 1984 मध्ये जगातील सर्वात मोठ्या ‘आयसीआय’ कंपनीने आम्हाला डिस्ट्रिब्युटर बनवले आणि 1994 पर्यंत येता-येता आम्ही देशातील सर्वात मोठे ट्रेडिंग हाऊस बनलो. 1995-96 मध्ये आम्ही स्मॉल स्केलवर एक्सप्लोसिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सुरू केले आणि 2004 पर्यंत आम्ही देशातील सर्वात मोठे प्रोड्युसर आणि एक्सपोर्टर बनलो. 2010 मध्ये आम्ही ठरवले की आपण डिफेन्स सेक्टरात आले पाहिजे. 2014 मध्ये भाजप सरकारने प्रायव्हेट सेक्टरमध्ये कम्प्लीट अॅम्युनिशन (दारूगोळा) चे लायसन्स देण्याची तरतूद केली. 2015 मध्ये आम्हाला हे लायसन्स मिळाले. आपल्या देशात 100 वर्षांपासून फक्त ऑर्डिनन्स फॅक्टरी होती किंवा आपण इम्पोर्ट करायचो, याच विचाराने आम्ही या सेक्टरमध्ये एन्ट्री केली.
Source link
दिव्य मराठी मुलाखत:दिव्य मराठी प्रश्न- रोबोटिक युद्धासाठी भारत सध्या किती तयार आहे? नुवाल- लवकरच ‘ह्युमनॉइड रोबोट' व ‘भार्गवास्त्र' तैनात होणार आहे…