Headlines

दरोड्याच्या तयारीतील 5 गुन्हेगारांना अटक:नागपुरात 4.82 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक साथीदार फरार




नागपूरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने अटक केली आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना घोरपड रोडवरील कृष्णा डेव्हलपरच्या मोकळ्या शिवारात काही संशयित घातक शस्त्रांसह दरोड्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून धाड टाकली. यावेळी पाच आरोपींना रंगेहात पकडण्यात आले, तर त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्षल ऊर्फ हऱ्या इंगोले, निखिल ऊर्फ निक्कू यादव, पिंटू भारती, रैशल मलखाम आणि अमन गोर यांचा समावेश आहे. यातील बहुतांश आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, घरफोडी, हद्दपारी आणि एमपीडीए अंतर्गत यापूर्वीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. फरार झालेला आरोपी रवी गुप्ता ऊर्फ बारीक याचा पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू, लोखंडी कटावणी, हातोडी, नायलॉन दोरी, मिरची पावडर, महागडे अँड्रॉइड मोबाईल आणि चार दुचाकी असा एकूण ४ लाख ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *