![]()
सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय शिवमहापुराण कथा या कार्यक्रमाची लखन महाराज पाटील चिंचखेडेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. या अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यान होत असलेल्या दररोजच्या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी लखन महाराजांनी उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहिभात, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुखी, सुखी घालू हुंबरी, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम या अभंगावर भाविकांना ज्ञानार्जन केले. या अभंगावर केलेल्या कीर्तनाने भाविक भक्त मंत्रमुग्ध झाले. यावेळी बोलताना लखन महाराज म्हणाले की, भगवंताने केलेल्या विविध लीला या प्रत्येक मनुष्याला काही ना काही संदेश देतात. भगवान श्रीकृष्णाचे चरित्र अनुकरणीय आहे. भगवंताने गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करावा म्हणजे तुमच्या या मनुष्य जन्माचे सार्थक होईल. अशा धार्मिक कार्यक्रमाचा उपयोग समाज सुधारण्यासाठी झाला पाहिजे तेव्हाच अशा कार्यक्रमाची खरी ओळख निर्माण होईल. असे धार्मिक कार्यक्रम म्हणजे सामाजिक एकात्मतेचे प्रतीक आहे. यामुळे समाज एकत्र येतो व या निमित्ताने विचारांची प्रगती होते. अखंड हरिनाम सप्ताहासारख्या कार्यक्रमांना हजेरी लावणाऱ्या भाविकांना ऊर्जा मिळते. याशिवाय जीवन जगण्यासाठी चैतन्य निर्माण होते. या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती, भजन, दुपारी शिवपुराण कथा व रात्री कीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आला. या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जयभवानी नगरमधील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. काल्याच्या कीर्तनानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा जय भवानी नगर परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. सिल्लोड येथील जयभवान नगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी काल्याचे कीर्तन करताना लखन महाराज पाटील चिंचखेडेकर.
Source link
भगवंताने केलेल्या विविध लीला प्रत्येक मनुष्याला संदेश देतात- लखन महाराज:जयभवानीनगरमधील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता