![]()
भारताची कुटुंब व्यवस्था ही संपूर्ण जगात अद्वितीय आहे. येणाऱ्या पिढीत संस्कारांचे बीजारोपण याच व्यवस्थेतून होते. मात्र, आज आपल्या या आदर्श कुटुंब व्यवस्थेला पाश्चात्त्य संस्कृतीची कीड लागली आहे. ही विकृती जर आपण वेळीच दूर केली नाही, तर आपली कुटुंब व्यवस्था ढासळेल. त्यामुळे हे सांस्कृतिक षड्यंत्र ओळखून समाजाने वेळीच जागे व्हावे,असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. शहरात आयोजित ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेतील चौथे पुष्प ‘संघाची शताब्दी आणि पंच परिवर्तन’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक प्रभाकर शिंदे, प्रांत संपर्क प्रमुख कैलास सोनटक्के, डॉ. रवींद्र साताळकर, सतीश मुळे, मनोज झंवर, डॉ. सतीश सोनावणे, डॉ. अभिजित पाठक आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै. ग. म. मुळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. भैय्याजी जोशी यांनी संघाच्या ‘पंच परिवर्तना’चा (सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, प्रकृती संरक्षण, स्वदेशी आचरण आणि नागरिक कर्तव्य) सोप्या भाषेत पटवून दिला. ते म्हणाले, “आज समाजात उच्च-नीच, शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत असे भेद आणि वितुष्ट वाढवले जात आहे. जातीयता आणि जातीयवादाची विकृती फोफावत चालली आहे. जोपर्यंत हा जातीयवादाचा वृक्ष आणि त्याची बीजे आपण नष्ट करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने हिंदूंचे संघटन होणार नाही. आपण सर्व एकच हिंदू समाज आहोत, ही भावना प्रत्येकाच्या मनात दृढ झाली पाहिजे. प्रकृती ही सर्वात शक्तिशाली आहे. तिचे केवळ पूजन किंवा वंदन करून चालणार नाही, तर तिच्या संरक्षण आणि संवर्धनाची प्रत्यक्ष जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. मानवाने आपली जीवनशैली संयमी ठेवून पंचमहाभूतांचा अमर्याद वापर टाळला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश कुलकर्णी यांनी, तर आभार डॉ. नीलकंठ ठाकरे यांनी मानले. व्याख्यान ऐकण्यासाठी विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडा इंग्रज आणि मुघलांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असे सांगत जोशी म्हणाले की, राष्ट्रहितासाठी प्रत्येकाचा ‘स्वबोध’ जागृत होणे गरजेचे आहे. आपली संस्कृती, मातृभाषा आणि देशी उत्पादनांचा अभिमानाने वापर करा. देशाचे सर्व नियम पाळणारा, अनुशासित आणि कर्तव्यदक्ष समाज जर आपण निर्माण केला, तर भविष्यात भारत जगात सर्वोच्च व गौरवशाली स्थान मिळवेल, असा विश्वास जोशी व्यक्त केला.
Source link
पाश्चात्त्य संस्कृतीच्या किडीपासून आपली कुटुंब व्यवस्था वाचवा:भैय्याजी जोशी यांचे आवाहन, जातीयवादाच्या वृक्षाची बीजे नष्ट करा