Headlines

पुण्यात दापोडी ते हडपसर मृत्यूंचं थैमान:विषारी दारूने 13 बळी, हातभट्टी माफियाचा काळा धंदा उघड; पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप, आरोपी अटकेत




पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. आतापर्यंत 13 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत ही घटना घडली असून, स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणामुळे पोलिस प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे योगेश वानखेडे नावाच्या सराईत दारू विक्रेत्याचा हात असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. त्याने तयार केलेली विषारी दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत विकली गेली होती. दारू सेवन केल्यानंतर अनेकांना अचानक चक्कर येणे, उलट्या होणे आणि तोंडाला फेस येणे अशी लक्षणं दिसू लागली. त्यानंतर काही तासांतच अनेकांचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. याशिवाय पुण्यातील काळेपडळ भागात 3 आणि हडपसरमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 48 तासांत आणखी 3 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अक्षय अवसरमल यांचा मृत्यू झाला, तर सौरभप्पा भंगारी यांचा मेडीपॉईंट रुग्णालयात मृत्यू झाला. भीमाप्पा बसवंत पुजारी यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. अवैध हातभट्टीची दारू परिसरात उघडपणे विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशा बेकायदेशीर धंद्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे निरपराध नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पोलिसांच्या मते मृत्यूची कारणं अद्याप स्पष्ट नाही दरम्यान, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत असताना पोलिसांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. पोलिसांच्या मते मृत्यूची कारणं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. काही जणांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांनी झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र मृत्यूपूर्वी अनेकांना तीव्र चक्कर आणि अस्वस्थता जाणवल्याचं पोलिसांनीच मान्य केल्याने संशय अधिक गडद झाला आहे. सध्या सर्व मृतांचे वैद्यकीय अहवाल आणि नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अंतिम अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण कायम आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *