![]()
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्रातील कारभारावर संशय व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत पीपीटी सादरीकरणाद्वारे गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान 6 महिन्यांत 6.5 लाख मतदार वाढले होते, मात्र लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या एका महिन्यातच 6.5 लाख नवीन मतदार कसे आणि कुठून वाढले, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत तब्बल 71 लाख मतदान जास्त झाल्याचे निदर्शनास आणून देत, या संपूर्ण प्रक्रियेत ईव्हीएम मॅनेज केले जात असल्याची जोरदार चर्चा राज्यभरात सुरू असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले, आम्ही पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेतले होते पण ज्ञानेश कुमार हा स्वतःला राजा समजतो. आयोग याच्या बापाचे आहे का? आमचे अनेक उमेदवार हे पिपाणीमुळे पडले. आम्ही अनेक वेळा सांगूनही ऐकले नाही. मतदानाची आकडेवारी पाहिली तर एक लॉजिक लावून एक सीक्वेंसमध्ये निवडून आलेल्या आमदारांची आकडेवारी आहे. तर पराभूत उमेदवारांची आकडेवारीही तशीच आहे. आम्ही आधार कार्ड कसे चुकीच्या पद्धतीने आणि फेक तयार केले जाते याची माहिती दिली होती. शिरूर विधानसभा मतदारसंघात दुबार नावाची माहिती आहे. त्यात आम्ही शोध घेतला तर माणसेच मिळाले नाही. बंगालमध्ये मतदार वगळून भाजप जिंकली पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटायला गेलो, ते फक्त गोड बोलतात पण प्रत्यक्ष काम काहीही करत नाहीत. आपण पश्चिम बंगालमध्येही पाहिले, तिथेही तशीच परिस्थिती होती. बंगालमध्ये मतदार वगळून भाजप जिंकली, तसेच महाराष्ट्रात 2029 मध्ये करणार आहे. बंगालचे 27 लाख मतदार अडकून ठेवले, त्यांना मतदान करता आले नाही. SIR वापरून तेथील जनता अडकवली, असा आरोप पवारांनी केला आहे. महाराष्ट्रात 2.6 कोटी नावे वगळण्यात आली बिहारमध्येसुद्धा हाच फॉर्म्युला वापरला गेला होता. महाराष्ट्रात एकूण 9.78 कोटी मतदार आहेत आणि आता 2.6 कोटी नावे वगळण्यात आली आहेत. खडकवासला मतदारसंघात 5,76,505 मतदार होते, एसआयआरमधून 2,77,851 वगळले, पण 2024 ला 3,26,667 एवढे मतदान झाले होते. त्यामुळे येथे बाहेरून माणसे आणली गेली, त्यांच्याकडून मतदान करून घेतले गेले आणि आता त्यांची नावे वगळली जात आहेत. आता एसआयआर झाले. आम्हाला म्हटले की, याद्यांचे शुद्धीकरण केले जाईल. परंतु आम्ही जी दुबार नावे मांडली होती ती एसआयआर नंतर पुन्हा आली असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. ज्ञानेश कुमार हे भाजपच्या हातातील बाहुले ज्ञानेश कुमार हे भाजपच्या हातातील बाहुले आणि देशद्रोही असल्याची घणाघाती टीका करत, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींचे थेट पुरावे माध्यमांसमोर मांडले. या सादरीकरणात त्यांनी भोसले नावाच्या एका जिवंत व्यक्तीला व्हिडिओ कॉल लावून त्यांना SIR यादीत मृत दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला, तर कर्जत-जामखेडमधील चिंचोली येथील स्थानिक रहिवासी परशुराम लांडघुले यांना यादीत कायमस्वरूपी स्थलांतरित दाखवल्याचा पुरावाही सादर केला. या सर्व प्रकारांच्या पार्श्वभूमीवर, लोकशाहीच्या रक्षणासाठी आगामी काळात ईव्हीएमच्या विरोधातही मोठे जनआंदोलन उभारण्याचा ठाम निर्धार रोहित पवार यांनी शेवटी व्यक्त केला.
Source link
'एका महिन्यात साडेसहा लाख मतदार कसे वाढले?':रोहित पवारांकडून निवडणूक आयोगाची 'पोलखोल'; ज्ञानेश कुमारांवरही गंभीर आरोप