Headlines

राज्यात 75 नव्हे तर 99 टक्के दुष्काळ:शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक आयोगाच्या कारभारावरूनही नाना पटोलेंचा भाजपला टोला




राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांपैकी ९९ टक्के आश्वासने पाळलेलीच नाहीत. भाजपने केवळ निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडणुका जिंकल्या आहेत का?” असा सवाल उपस्थित करत पटोले यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ‘शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या’ राज्यात जाहीर झालेल्या दुष्काळाबाबत बोलताना पटोले म्हणाले की, “यंदा राज्यात भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. कर्नाटक सरकारने महिनाभरापूर्वीच शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, मात्र महाराष्ट्राचे सरकार आता केवळ घोषणा करत आहे. या काळात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची जबाबदारी कोण घेणार? राज्यात केवळ ७५ टक्के नव्हे, तर ९९ टक्के दुष्काळ आहे. त्यामुळे उर्वरित भागातही तातडीने पंचनामे करावेत आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत त्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी भरीव आर्थिक मदत करावी.” बावनकुळेंवर पलटवार ‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द नेहमीच पाळला आहे’, या भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पटोले म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांची नोकरी टिकवण्यासाठी फडणवीसांची तारीफ करावीच लागेल, नाहीतर नोकरी जाईल. फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. बावनकुळेंनी किती आश्वासने पूर्ण केली त्याची यादी वाचून दाखवावी. आमची स्पष्ट भूमिका आहे की, त्यांनी दिलेली ९९ टक्के आश्वासने अजूनही पाळलेली नाहीत.” निवडणूक आयोगावरून भाजपवर हल्लाबोल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर नाना पटोले यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, “आमचा आक्षेप भारतीय जनता पार्टीवर नसून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आहे. आयोगातील इतर दोन सदस्यांनी गडबडीबाबत पत्राद्वारे माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होत असताना भाजप ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ एवढ्या ताकदीने पुढे का येत आहे? याचाच अर्थ महाराष्ट्र, हरियाणा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश आणि आसाममधील भाजपचे विजय निवडणूक आयोगाच्या कृपेनेच झाले आहेत का?” जनतेमध्ये निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी प्रचंड उद्रेक असून, लोकांच्या मतदानाच्या अधिकारावर घाला घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “सरकारने जनतेला घाबरायला हवे, पण सध्या जनता सरकारला घाबरत आहे. भाजपच्या राज्यात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था डबघाईला आल्या आहेत,” अशी टीका नाना पटोले यांनी केली. ही बातमी वाचा.. महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर!:राज्याच्या 75 टक्के भागाला तातडीने दिलासा; कर्जवसुलीस स्थगिती, परीक्षा फी माफीसह मुख्यमंत्र्यांचे 12 मोठे निर्णय पावसाच्या मोठ्या खंडाने आणि अल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये अधिकृतरीत्या कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ (Trigger-1) लागू झाली असून, महसूल व मदत-पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के भूभाग आता दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला असून, शेतकऱ्यांसाठी सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *