Headlines

आधारकार्डचा गैरवापर करत 82 वर्षीय वृद्धाची 10.74 कोटींची फसवणूक:रीलस्टार रोहन जाधवला सायबर पोलिसांकडून अटक




एका ज्येष्ठ नागरिकाच्या आधारकार्डचा गैरवापर करून तब्बल 10 कोटी 74 लाख 65 हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी मुख्य आरोपी रोहन रामेश्वर जाधव याला अटक केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी 1 कोटी 34 लाख रुपये गोठवण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या आधारकार्डचा वापर करून 23 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत बनावट खाते उघडण्यात आले होते. या खात्याचा वापर करून तक्रारदाराला विविध आमिषे दाखवून आणि आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून अटक होण्याची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. तांत्रिक तपासात तक्रारदाराच्या फसवणुकीतील रकमेपैकी 75 लाख रुपये एका येस बँक खात्यात जमा झाल्याचे समोर आले. त्यानंतर या खात्यातून बँक ऑफ महाराष्ट्राच्या तीन वेगवेगळ्या खात्यांवर 6 लाख 50 हजार रुपये वळवण्यात आले. सायबर क्राइम पोर्टलवरील माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी यापूर्वी हर्षद सुभाष धनतोडे, समर्थ सुरेश देशमुख आणि अमर अत्तारगी या आरोपींना अटक केली होती. या तपासात रोहन जाधव हा या टोळीचा प्रमुख साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. त्याने वापरलेल्या बँक खात्यांमधून फसवणुकीशी संबंधित तब्बल 29 गुन्हे व तक्रारी उघडकीस आल्या आहेत. तसेच त्याचे आंतरराष्ट्रीय हॅकर्सच्या संशयित आरोपींशीही संपर्क असल्याचे तपासात समोर आले आहे. फरार असलेल्या जाधवविरोधात न्यायालयाने यापूर्वी अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्याचा शोध घेत असताना पोलिसांनी त्याचे बँक व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि इतर आरोपींशी असलेले संबंध याबाबत पुरावे गोळा केले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जाधव हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून, 2022 पासून पिंपळे निलख परिसरात वास्तव्यास होता. तो ‘रिलस्टार’ म्हणून इन्स्टाग्रामवर काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात तक्रारदारांचे पैसे 5 हजार 436 बँक खात्यांमध्ये हस्तांतरित झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते आणि आर्थिक व सायबर विभागाचे उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *