![]()
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुण्यात लवकरच एक सहाय्यता कक्ष सुरू करण्यात येणार आहे. शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही घोषणा केली. महेश बडे यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने डॉ. गोऱ्हे यांची त्यांच्या सिल्व्हर रॉक्स निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी या विषयावर सविस्तर चर्चा झाली. या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा वेळेत घेण्याची, आयोग आणि विद्यार्थ्यांमध्ये नियमित संवाद साधण्याची आणि त्यांच्या मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन न्याय देण्याची मागणी केली. त्यांनी ‘सारथी’ आणि ‘बार्टी’ यांसारख्या शासकीय संस्थांना मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर व्हावा, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिष्टमंडळाने डॉ. गोऱ्हे यांच्याकडे विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधण्यासाठी आठवड्यातून एकदा स्वतंत्र कार्यालयात भेटीचे आयोजन करण्याची विनंतीही केली. यावर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी, आयोगाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयांमध्ये कोणते बदल आवश्यक आहेत, याचा अभ्यास करून त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच, स्पर्धा परीक्षांशी संबंधित न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची यादी तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे हा सहाय्यता कक्ष सुरू होईल. या कक्षामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश असेल. हा कक्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्वमदत गटाच्या स्वरूपात कार्य करेल. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे. आयोगाचा कारभार ठरलेल्या वेळेनुसार पार पडावा आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय व्हावेत यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ज्या प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, त्या विषयांवर शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
Source link
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पुण्यात सहाय्यता कक्ष:डॉ. नीलम गोऱ्हे यांची घोषणा, समस्या सोडवण्यास मदत