![]()
उन्हाळ्यात जायकवाडी धरणाचा डाव आणि उजवा कालवा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरले आहेत. सध्या या दोन्ही कालव्यांमधून ३८०० क्युसेकने सुरू असलेल्या पाणीपाळीमुळे संभाजीनगरसह पाच जिल्ह्यांतील पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांना आधार मिळाला आहे. सध्या जायकवाडी धरणामध्ये ३७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या साठ्यातून दोन्ही कालव्यांमधून यंदाच्या हंगामातील तिसरी पाणीपाळी सोडण्यात आली आहे. यामध्ये डाव्या कालव्यातून सुमारे २ हजार २०० क्युसेक, तर उजव्या कालव्यातून १ हजार ६०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्यावर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. या आवर्तनामुळे प्रामुख्याने बहुवार्षिक पिके असलेल्या ऊस, केळी, संत्रा यांसह उन्हाळी भुईमूग, तीळ, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाची वाढती तीव्रता पाहता, आगामी काळात जोपर्यंत सार्वत्रिक आणि जोरदार पाऊस होत नाही, तोपर्यंत पिके जगवणे हे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. हीच गरज ओळखून पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला असल्याने समाधान व्यक्त होत आहे. ठिबकचा वापर करावा जायकवाडी धरणातून सध्या उन्हाळी पिकांसाठी दोन्ही कालव्यांतून पाणी सोडले जात आहे. जून महिन्यात पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. या पाण्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. परंतु, पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करावा. काटकसरीने पाण्याचे नियोजन करण्यात यावे. – प्रशांत संत, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग जोपर्यंत मोठा पाऊस येत नाही, तोपर्यंत पाणी सुरू ठेवण्यात यावे जायकवाडीच्या कालव्यातून सुरू असलेले पाणी आवर्तन. सध्या भाजीपाला आणि इतर उन्हाळी पिके काढणीच्या व अत्यंत संवेदनशील अवस्थेत आहेत. जर अचानक कालव्याची पाणीपाळी बंद झाली, तर या पिकांचे उन्हामुळे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मान्सूनचा दमदार पाऊस सक्रिय होईपर्यंत सिंचनासाठीची ही पाणीपाळी अशीच सुरू ठेवावी, अशी आग्रही मागणी पैठण ता लुक्यातील शेतकरी नेते अप्पासाहेब निर्मळ, दीपक मोरे, किशोर दसपुते आणि शेखर देशमुख यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे प्रशासनाकडे केली आहे.
Source link
जायकवाडीमुळे पावणेदोन लाख हेक्टर पिके जोमात:छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणीतील शेतकऱ्यांना फायदा