![]()
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गाच्या चौपदरीकरणासाठी प्रस्तावित भूसंपादन प्रक्रियेविरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक झाले असताना, प्रशासनाने आता जागेच्या मोजमापासाठी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांची समिती स्थापन केली आहे. आमदार हिरामण खोसकर यांनी विधिमंडळात शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच भूसंपादन प्रक्रियेविरोधातील मुद्दे उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. आहुर्ली ते म्हसुर्ली दरम्यानच्या वहिवाटींच्या रुंदीबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने शुक्रवारी (दि. २९) प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार अभिजीत बारवकर, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर तसेच मोजमाप अधिकाऱ्यांनी रस्त्यालगतच्या वहिवाटींची तपासणी केली. प्रत्येक गावात सुमारे ५०० मीटर अंतरावर मोजणी करण्यात आली. पाहणीत वहिवाटींची रुंदी ५ ते ६ मीटर दरम्यान असल्याचे आढळून आले. प्रांत अधिकाऱ्यांनी शासनाला १२ ते १४ मीटर वहिवाट असल्याचा चुकीचा अहवाल सादर केल्याचा आरोप शेतकरी कृती समितीने केला आहे. यासंदर्भात आमदार हिरामण खोसकर यांच्या माध्यमातून महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती नागेश गायकर यांनी दिली. या पाहणी दौऱ्यात शेतकरी कृती समितीचे सचिव गोरख वाजे, उपसभापती संपत वाजे, माजी सरपंच दत्तू खकाळे, अंकुश महाले यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
Source link
घोटी-त्र्यंबक मार्गावरील भूसंपादनाची प्रत्यक्ष पाहणी:मोजमापासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन