![]()
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जे काम होऊ शकले नाही, ते एका न्यायालयीन लढ्यामुळे अवघ्या तीन वर्षांत पूर्ण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या वेंगनूर ग्रामपंचायतीने न्यायालयीन लढ्याच्या जोरावर तब्बल ३८ कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून गावाचे नशीब बदलले आहे. वेंगनूर हे मुलचेरा तालुक्यातील अत्यंत दुर्गम व दुर्लक्षित असे गाव आहे. येथील ग्रामपंचायतीअंतर्गत अळंगेपल्ली, सुरगाव, पडकोटोला या गावांचा समावेश आहे. ही सगळी गावे कन्नमवार जलाशयाच्या पोटाशी, घनदाट जंगलात वसलेली आहेत. पावसाळ्यात जलाशयात पाणी साचत असल्यामुळे या गावांचा चार ते पाच महिन्यांसाठी संपर्क तुटायचा. आज वेंगनूर ग्रामपंचायत विकासाचे मॉडेल बनली आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे हा मोठा विजय मिळाला आहे. गावात गुळगुळीत रस्ते, नदी-नाल्यावर पूल, गावात मोबाइल नेटवर्क, आरोग्य उपकेंद्र, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, सुसज्ज वाचनालय आदी विकासात्मक कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. इनसाइड स्टोरी – ३ वर्षांत कायापालट प्रशासकीय अनास्थेनंतर एका पत्राने उच्च न्यायालयाचे लक्ष वेधून घेतले. वेंगनूर आणि परिसरातील गावांसाठी हा कायदेशीर लढा केवळ रस्ते किंवा पुलांपुरता मर्यादित नव्हता, तर तो जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी होता. अनेक वर्षे दुर्लक्ष केलेली गावे गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे आता विकासाचे मॉडेल बनली आहेत. लढ्यातूनच विकास साध्य गावाला रस्ता, आरोग्याची सुविधा नव्हती. परंतु, पाथ फाऊंडेशनचे अॅड. बोधी रामटेकेंच्या सहकार्याने गावाने उभारलेल्या न्यायालयीन लढ्याला तीन वर्षांत मोठे यश आले. आता गावापर्यंत रस्ता, आरोग्य केंद्र, वाचनालय आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. -नरेश कांदो, सरपंच
Source link
जनहित याचिकेमुळे गावाला मिळाले पक्के रस्ते, पूल व आरोग्य केंद्र:वेंगनूरचे नशीब बदलले; 38 कोटींतून गावाचा कायापालट