Headlines

लाडकी बहीण योजनेत आणखी 60 महिला वगळणार:जयंत पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप; विजय वडेट्टीवार, रोहित पवारांचीही टीका




मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत झालेल्या मोठ्या घटीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्या या योजनेतील लाभार्थींची संख्या 1 कोटी 66 लाखांवर आली असून, आगामी काळात आणखी 50 ते 60 लाख महिलांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोणतीही कठोर पडताळणी न करता मोठ्या प्रमाणावर महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यानंतर सत्तेत आल्यानंतर लाभार्थ्यांची तपासणी सुरू करून लाखो महिलांना अपात्र घोषित करण्यात आले. निवडणुकीच्या वेळी सर्वांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याच महिलांना योजनेबाहेर काढले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. जयंत पाटील यांनी सरकारच्या आर्थिक नियोजनावरही निशाणा साधला. त्यांच्या मते, राज्य सरकारला या योजनेसाठी होणारा खर्च कमी करायचा आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांची संख्या घटवली जात आहे. आज 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून, पुढील वर्षभरात आणखी 50 ते 60 लाख महिलांची नावे कमी केली जाऊ शकतात. यामागे आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. लाडकी बहीण योजना सुरू करताना शासनाला संभाव्य गैरप्रकारांची कल्पना नव्हती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर काही लाभार्थी खरोखरच अपात्र किंवा बोगस होते, तर त्यांना जवळपास 19 ते 20 महिने अनुदान कसे मिळाले? या काळात संबंधित यंत्रणा काय करत होती? अशा लाभार्थ्यांना निधी वितरित होण्यामागे जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. योजना टप्प्याटप्प्याने बंद करण्याचाही प्रयत्न – जयंत पाटील जयंत पाटील यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या पोस्टमधून सरकारवर टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मोठ्या प्रमाणावर या योजनेचा लाभ देण्यात आला. आता त्याच योजनेतील 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आज लाखो महिलांची नावे वगळली गेली असून उद्या आणखी काही लाख महिलांना विविध कारणे देत अपात्र ठरवले जाऊ शकते. पुढे ही योजना टप्प्याटप्प्याने बंद करण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, असे म्हणत त्यांनी सरकारच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. शासनाने सुरुवातीपासूनच योग्य पडताळणी आणि नियोजन केले असते, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही त्यांनी स्पष्ट केले. लाडक्या बहिणींचा तळतळाट भोगावा लागेल – विजय वडेट्टीवार लाडक्या बहिणीला त्रास दिला तर याद राखा – रोहित पवार या संदर्भात आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर टीका केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘निवडणुकीपूर्वी 2.47 कोटी लाभार्थी असलेल्या लाडकी बहीण योजनेत या लबाड सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावे उडवली आहेत. KYC फक्त बहाणा आहे, लाभार्थी लाडक्या बहिणींची नावे टप्प्याटप्प्याने उडवून योजना बंद करणे हाच खरा निशाणा आहे. आज या लाडक्या बहिणीला बोगस लाभार्थी म्हणणाऱ्या सरकारने निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही KYC न करता योजना राबवली असेल तर ही लाडक्या बहिणीची फसवणूक करून सरकारने केलेली बोगसगिरी नाही का ? लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारे त्रास दिला किंवा पैसे परत घेण्याची भाषा केली तर सरकारला महागात पडेल. त्यामुळे सरकारला या 15000 हजार कोटीची वसुली करायचीच असेल तर मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून करावी, लाडक्या बहिणीला कुठल्याही प्रकारे त्रास दिला तर याद राखा…!’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *