Headlines

पुणे मध्यभागात पोलिसांची झाडाझडती:सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या 40 जणांवर कारवाई; अमली पदार्थ सेवनावर नियंत्रण




पुणे शहराच्या मध्यभागातील डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, तसेच विश्रामबाग, खडक, समर्थ आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुरुवारी रात्री पोलिसांनी विशेष झाडाझडती मोहीम राबवली. या कारवाईत बेकायदा प्रकार करणाऱ्या 40 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 41 संवेदनशील ठिकाणे, मोकळ्या जागा, तसेच सार्वजनिक जागांची तपासणी करण्यात आली. गुरुवारी रात्री दोन तास ही मोहीम सुरू होती. सार्वजनिक मद्यप्राशन, अमली पदार्थांचे सेवन, शांतता भंग करणे, तसेच छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई केली. भारतीय न्याय संहिता 285 अन्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध (कोटपा ॲक्ट) पाच खटले दाखल करण्यात आले. याशिवाय, महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये २२ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. ट्रिपल सीट जाणाऱ्या दहा दुचाकीस्वारांविरुद्ध तसेच वाहन चालविताना मोबाइलवर संभाषण करणे आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, समर्थ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके या कारवाईत सहभागी झाली होती. यापुढील काळात पोलिसांकडून अचानक कारवाई करण्यात येणार असून, संवेदनशील ठिकाणांची तपासणी सुरूच राहील. वाहन चालक यांनी नियमांचे पालन करावे असे पोलीस उपायुक्त रावले यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *