![]()
सिल्लोड तालुक्यातील शिवना महसूल मंडळात अनेक वर्षांपासून प्रलंबित अतिक्रमित शेत रस्त्यांचा प्रश्न महसूल प्रशासनाच्या मध्यस्तीने यशस्वी मार्गी लागला आहे. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत होते. मंडळातील ८ गांवात १२ रस्ते मोकळे करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळ्यात शेतात पेरणी, मशागत व इतर कामांसाठी जाणे-येणे आता सुलभ झाले आहे. गावांमधील जुने पाणंद रस्ते शेतकरी व तहसील प्रशासनाच्या सामोपचाराने अतिक्रमणमुक्त करून ते बारमाही वापरासाठी मजबूत करणे या उद्देशाने सुरु असलेले पाणंद रस्ते अभियान शेतकऱ्यांसाठी लाभ दायक ठरत आहे. गेली वर्षानुवर्षे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अतिक्रमित रस्त्यांच्या समस्या आता हळूहळू सामोपचाराने मिटू लागल्या आहेत. पावसाळ्यातही शेतीची अवजारे, ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रसामग्री शेतात सहज नेता यावी यासाठी हे रस्ते बारमाही आणि मजबूत १२ फूट ते १६ फूट रुंद केले जात आहेत. महसूलच्या आव्हानाला प्रतिसाद देत शेतकरी आपापसातील वाद मिटवून शेत रस्ते मोकळे करून घेत आहे. शिवना महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी शेतरस्त्यासाठी वारंवार मागणी केली होती. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवना मंडळ अधिकारी विजय शेळके, तलाठी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, महसूल सेवक व गावातील प्रतिष्ठित मंडळींना सोबत घेऊन अर्जदारांच्या शेतावार प्रत्यक्ष पाहणी दरम्यान समस्या जाणून घेतल्या व रस्ते मोकळे करून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. शिवना परिसरातील रस्ते खुले झाल्याने समस्या मिटली -मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते अभियानातून मंडळातील खुपटा ०१, मादनी ०३, शिवना ०२, आमसरी ०२, वाघेरा ०१, वडाळी ०१, अजिंठा ०१ व अनाड ०१ हे रस्ते मोकळे करण्यात आले आहे. तर पुढील कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात वडाळी ०१, शिवना ०२, आमसरी ०१, जळकी बाजार ०१, येथील रस्ते मोकळे करण्यासाठी अहवाल प्रस्तावित आहे. काही रस्ते मोकळे झाल्याने समस्या मिटली आहे.
Source link
शिवना मंडळात 12 शेत रस्ते खुले, शेतकऱ्यांना दिलासा:महसूल प्रशासनाची मध्यस्थी, नागरिकांत आनंदाचे वातावरण