Headlines

नागरिकांचा संताप:टाकरखेडा संभूत पाणीटंचाई; नवीन जलकुंभ अद्याप बंदच, समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा‎




येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकरखेडा संभूचा समावेश असला तरी नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच निकट भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या दीड लाख हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ कार्यरत आहे. यातून सध्या पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, जल जीवन मिशन अंतर्गत दोन वर्षांपूर्वी आणखी ५० हजार लीटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली; मात्र अद्याप त्या टाकीला पाईपलाईन जोडण्यात आलेली नाही. त्यामुळे नवीन जलकुंभ असूनही त्याचा कोणताही उपयोग नागरिकांना होत नाही. नवा जलकुंभ कार्यान्वित न करण्यात आल्याने गावातील अनेक भागांमध्ये चार ते पाच दिवसांनी पाणी सोडले जाते. बहुतेक ग्रास्थांना विहीर, हापशी तसेच इतरांच्या घरुन पाणी आणावे लागत आहे. विशेषतः भीमवाडी आणि झोपडपट्टी भागात परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. दरम्यान, टाकरखेडा शंभू येथील रहिवासी शैलेश चांदुरकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे. गेल्या एक महिन्यापासून नळाला अजिबात पाणी येत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. नियमित पाणी बिल भरूनही पुरवठा होत नसल्याने प्रशासनाने तातडीने कारण शोधून पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे आमच्या भागात पाणीच येत नाही. ग्रामपंचायतीला फोन केल्यानंतरच कधीतरी पाणी मिळते. १०० ते १५० घरांची वस्ती पाण्याविना त्रस्त आहे, अशी प्रतिक्रिया भीमवाडी निवासी अरुण मेश्राम यांनी व्यक्त केली. तर येथीलच ज्येष्ठ नागरिक मधुकरराव भालचक्र यांच्यामते “झोपडपट्टी भागात पाणी येत नाही. पाण्यासाठी बसस्टँड, विहीर आणि हापशीवरच जावे लागते. अशीच स्थिती इतर भागांचीही आहे. या भागांचे प्रतिनिधी म्हणून रामराव गुल्हाने म्हणाले, आम्हाला थेट पाच दिवसांनीच पाणी मिळते. तेही कमी वेळासाठी येत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. यंत्रणेतर्फे बांधलेला जलकुंभ, ज्याचा वापर सुरू झाला नाही. …तर उपोषण आंदोलन करुच यासंदर्भात उपसरपंच प्रदीप शेंडे यांनी प्रशासनाला वारंवार निवेदने दिली आहेत. आमदार, खासदार आणि आढावा बैठकीतही प्रश्न उपस्थित केला. मात्र तरीही कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळेच पाणी समस्या तातडीने सोडवली नाही तर ग्रामस्थांच्यावतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *