Headlines

जोर्वेत 411 नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा:प्रवराकाठच्या जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव- माजी मंत्री थोरात‎




एक जून हा अनेकांचा अधिकृत वाढदिवस असतो; परंतु संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक जोर्वे गावाने एकत्र येत तब्बल ४११ महिला व नागरिकांचा फेटे बांधून, पारंपारिक पद्धतीने सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. “हा उपक्रम आपली समृद्ध परंपरा जपणारा असून जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव आहे,” असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. जोर्वे येथील लक्ष्मीआई मंदिरामध्ये या अनोख्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, इंद्रजीत थोरात, शरद थोरात, के.के. थोरात, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात आदी मान्यवरांच्या हस्ते वाढदिवस असलेल्या सर्व नागरिकांचा शाल, बुके आणि फेटे बांधून विशेष सत्कार करण्यात आला, तसेच सर्वांनी मिळून केक कापला. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्रवराकाठच्या जोर्वे संस्कृतीचा उल्लेख आंतरराष्ट्रीय पातळीवर होतो, अगदी दिल्लीच्या म्युझियममध्येही याची नोंद आहे. या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा असून थोरात परिवाराची नाळ गावाशी आणि येथील मातीशी कायम जोडलेली आहे. गावाने विविध संस्थांच्या माध्यमातून सहकाराचे जाळे निर्माण केले असून पुढील पिढी सुसंस्कृत घडवण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात डॉ. जयश्री थोरात, शरद थोरात आणि के.के. थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक इंद्रजीत थोरात यांनी केले, तर सूत्रसंचालन रामदास काकड यांनी केले. एक गाव, एक वाढदिवस आणि नवा आदर्श! : गावाने आपसातील मतभेद बाजूला सारून सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी गावातील ४११ नागरिकांचा एकाच वेळी सामूहिक वाढदिवस साजरा केला. जोर्वे गावाला असणारा पुरातत्वीय आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेत, या नव्या सामाजिक परंपरेचे उपस्थित मान्यवरांनी व पंचक्रोशीतील नागरिकांनी विशेष कौतुक केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *