Headlines

मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर:वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सतर्कतेचा इशारा; अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट




महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले असून राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत मॉन्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर वर्धा, अकोला आणि नागपूर येथे 42 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदविण्यात आले. जळगाव, अमरावती, भंडारा आणि गोंदिया येथे 41 अंशांहून अधिक तापमान होते, तर मालेगाव, चंद्रपूर आणि यवतमाळ येथे 40 अंशांच्या पुढे तापमान गेले. राज्यातील उर्वरित भागांमध्ये तापमान 40 अंशांच्या खाली आले असले तरी उकाडा कायम आहे. दुसरीकडे महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी 18.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामानातील या बदलामागे विविध वातावरणीय घडामोडी कारणीभूत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात गोव्याच्या किनाऱ्यालगत 3.1 ते 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय नैऋत्य अरबी समुद्रापासून कोकण आणि मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. केरळ किनाऱ्यालगतही समुद्रसपाटीपासून 3.1 ते 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तर अंदमान समुद्रात 3.1 ते 7.6 किलोमीटर दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड परिसरातून विदर्भ, तेलंगणा, रायलसीमा आणि उत्तर तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. या सर्व घडामोडींमुळे मॉन्सूनला गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा येथे जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, माण तालुक्यातील दहिवडी आणि मलवडी परिसरात मंगळवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. एका मोठ्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळल्याने दहिवडी-मलवडी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. खरीप पेरणीसाठी घाई करू नये या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खरीप पेरणीसाठी कोणतीही घाई करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतर आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा, असे नमूद केले. अपुऱ्या पावसामुळे बियाण्यांचे नुकसान होण्याचा धोका टाळण्यासाठी संयम आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. यंदा पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून योग्य नियोजन, समाधानकारक पाऊस आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास यंदाचा खरीप हंगाम यशस्वी ठरेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मॉन्सूनच्या प्रगतीबाबतही सकारात्मक संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसांत मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडूच्या उर्वरित भागात, कर्नाटकातील आणखी काही क्षेत्रांमध्ये आणि आंध्र प्रदेशात मॉन्सूनची आगेकूच सुरू राहण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातूनही मॉन्सून पुढे सरकत असून ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये त्याचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *