Headlines

सरकारचे शंभर अपराध भरले म्हणून तरुणाईने सुदर्शन चक्र वापरले:अंबादास दानवेंचा घणाघात; छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाचा जल्लोष




केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर शनिवारी राजीनामा दिला. त्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तिरंगा जल्लोष सभेचे आयोजन केले होते. याला मुंबईकरांनी तसेच महाराष्ट्रातील अनेक युवकांनी भरघोस प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगर येथे देखील ठाकरे गटाकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंबादास दानवे यांच्यासह इतर नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर होणारच होता. देशभरात तरुणाई आणि विद्यार्थ्यांचा जो रोष होता. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नसता तर हा रोष आणखी वरपर्यंत गेला असता, राजीनामा मागणे हे योग्य होते आणि त्यांनी राजीनामा दिला, हेही योग्य झाले. नीट पेपर फुटीच्या प्रकरणात दंड ठोठावण्यापेक्षा पेपरफुटी होऊ नये, याचा बंदोबस्त करणे हे मला महत्त्वाचे वाटते. शंभर अपराधांनंतर श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र वापरले होते. तसे या सरकारचे शंभर अपराध झाल्यानंतर आता या तरुणाईने सुदर्शन चक्र वापरले, अशी टीका दानवे यांनी केली आहे. मुलींचे कपडे फाडले गेले. हे कायदेशीर आहे का? पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, भाजपचा परिवार बोगस आहे. सगळंच करप्ट आहे. त्यामुळे तो असला तरी काही फरक पडणार नाही. महिना दोन महिन्यांनी कळेल भाजपचा परिवार आहे की नाही. त्यांनी देशाचे हित बघितले असते, तर पेपर फुटलेच नसते. ज्या दिवशी पेपर फुटला, त्या दिवशी राजीनामा दिला असता तर आम्ही म्हटले असते की देशाचे हित बघितले आहे. शेकडो मुले जखमी झाली, शेकडो मुली जखमी झाल्या, मुलींचे कपडे फाडले गेले. हे कायदेशीर आहे का? या रोषातून त्यांना राजीनामा द्यावा लागला, अन्यथा हे भस्मसात झाले असते. आम्ही श्रेय घेण्यासाठी मोर्चा काढलेला नाही अंबादास दानवे पुढे म्हणाले, आम्ही श्रेय घेण्यासाठी मोर्चा काढलेला नाही. आम्ही तरुणाईला श्रेय देतो. तरुणाईची शक्ती एकवटल्यामुळे हे झाले आहे. व्यवस्थेच्या विरोधात तरुणाईने आवाज उठवला आहे, यात काय राजकीय फायदा आहे? आम्ही झेंडा घेऊन गेलो असतो, आमची निशाणी घेऊन गेलो असतो, तर झाला राजकीय झाला असता. खुर्चीशिवाय तुमच्याकडे आहेच काय? आम्ही खुर्चीसाठी सत्तेत नसतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर अंबादास दानवे म्हणाले, सत्ता आणि खुर्चीशिवाय तुमच्याकडे आहेच काय? तुम्ही गद्दारी सत्तेसाठीच केली. दिल्लीला वाऱ्या मारतात, पण काश्मीर प्रश्नावर बोलतात का? असा सवाल दानवे यांनी केला आहे. हे मस्तीला आलेले लोक आहेत केंद्र सरकारवर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले, भाजपमध्ये राजीनामे होत नाहीत. आम्ही आंदोलन दडपून टाकू, शेतकरी बसले होते आंदोलनाला, मग सरकारने शेतकऱ्यांचा बळी घेतला. नंतर खूप दिवसांनी त्यांनी कायदे मागे घेतले. हे मस्तीला आलेले लोक आहेत. ती मस्ती आता तरुणांनी उतरवली आहे. तरुणांनी मस्ती उतरवल्यामुळे जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आहे की यांनाही झुकवता येते आणि हे झुकतात. या पोरांनी पार बिनपाण्याची करून टाकली सगळ्यांची जेन झीने सरकारच्या झिंज्या उपटल्या असे राज ठाकरे यांनी म्हटले होते, त्यावर अंबादास दानवे म्हणाले, त्यांचे बरोबर आहे. मुलं सरकारविषयी काय बोलली, काय गाणी रचली. आम्ही विरोधक आहोत, मानही ठेवला पाहिजे. मात्र, या पोरांनी पार बिनपाण्याची करून टाकली सगळ्यांची. नरेंद्र मोदी साहेबांविषयी इन्स्टाग्राम व्हिडीओ खाली काय काय लिहिले, ते वाचा, असेही दानवे यांनी यावेळी म्हटले. वेगळा विदर्भ होऊ शकत नाही सध्या पुन्हा एकदा वेगळा विदर्भ करण्याची मागणी काही लोकांकडून केली जात आहे, याविषयी विचारले असता अंबादास दानवे म्हणाले, वेगळ्या विदर्भाची मागणी काही लोक चर्चेत येण्यासाठी करत आहेत. ही मागणी कोणाचीच नाही. उगाच राजकीय अस्तित्व राहिले नाही, म्हणून असे लोक मागणी करत आहेत. वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. हा मराठी माणसाचा अखंड महाराष्ट्र असाच कायम राहील असे दानवे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *