Headlines

100 वे साहित्य संमेलन व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल:कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा विश्वास; विद्यापीठात कार्यशाळा




100 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन केवळ साहित्यिक कार्यक्रम न राहता एक व्यापक सांस्कृतिक उत्सव ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला आहे. या संमेलनामुळे पुणे शहराची ‘पुस्तकांची नगरी’ ही ओळख अधिक दृढ होईल, असेही ते म्हणाले. मराठीचा प्रचार-प्रसार हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट असून, यामुळे मराठी भाषा भवनाला नवी झळाळी मिळेल, असे डॉ. गोसावी यांनी नमूद केले. डॉ. गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखा पदाधिकाऱ्यांच्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते. २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १००व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ९९ साहित्य संमेलनांच्या नियोजनासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत परिषदेच्या शाखा आणि संस्थांचे २००हून अधिक सदस्य सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक, समर्थ युवा फाउंडेशनचे विश्वस्त राजेश पांडे, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, मसापचे प्रदीप निफाडकर, प्रसाद मिरासदार, सुनील महाजन आणि बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते. विद्यापीठाला मराठी साहित्याची समृद्ध परंपरा लाभली असून, शंभरावे साहित्य संमेलन येथे होत असल्याचा अभिमान आहे, असे डॉ. गोसावी यांनी सांगितले. मराठीत एक हजार पुस्तकांच्या लेखनासाठी विद्यापीठाची नोडल संस्था म्हणून निवड झाली असून, संमेलनाच्या यशस्वी आयोजनात विद्यापीठ सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. योगेश सोमण यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लोकसहभागातूनच साहित्य संमेलन अधिक भव्य आणि यशस्वी होईल. संमेलन काळात चार दिवस संपूर्ण विद्यापीठ परिसर साहित्याच्या उत्सवाने उजळून निघेल आणि देश-विदेशातील मराठी भाषिकांना या ऐतिहासिक सोहळ्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. राजेश पांडे म्हणाले की, ९९ साहित्य संमेलने यशस्वी करण्यासाठी समर्थ युवा फाउंडेशनकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्यातील शाखा अधिक बळकट होतील. स्थानिकांचा सहभाग वाढवत साहित्य संमेलन समाजाचा उत्सव बनविण्यासाठी युवा कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोमण यांनी पुढे सांगितले की, १००वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे पहिले संमेलन असल्याने त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. समाजाला जोडणारे ९९ विषय, विविध बोलीभाषा, लोकसाहित्य, नवोदित लेखकांना मुख्य प्रवाहात स्थान आणि जगभरातील मराठी भाषिकांना एका धाग्यात जोडण्याचा संकल्प या संमेलनातून साकारला जाणार आहे. साहित्याचा उत्सव हा समाजाचा उत्सव व्हावा, मराठीला ज्ञान, संस्कृती, अस्मिता आणि रोजगाराची भाषा म्हणून अधिक सक्षम करण्याबरोबरच भावी पिढीसाठी सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा निर्धारही या संमेलनातून व्यक्त होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *