![]()
हडपसर भागातील एका सोसायटीत झालेल्या घरफोडीचा छडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत लावला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका चोरट्याला हडपसर परिसरातून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. फैजल इसरार खान (वय १८, रा. ढकाई, कोशांबी, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. हडपसरमधील सम्राट गार्डन सोसायटीतील एका सदनिकेचे कुलूप तोडून सोनसाखळी आणि कर्णफुले असे एकूण साडेतीन लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आले होते. ही घटना २३ जुलै रोजी उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तपास पथकातील पोलीस कर्मचारी कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार आणि महावीर लोंढे यांना घरफोडी करणारा चोरटा हडपसरमधील माळवाडी भागात थांबल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून फैजल खान याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक विजय पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी दीपक कांबळे, नीलेश किरवे, भाऊसाहेब कटके, विजय कोनकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध साेनवणे आणि महेश चव्हाण यांनी ही यशस्वी कामगिरी केली. पादचारी तरुणाला मारहाण करून लुटले दरम्यान, शहरात दुसरीकडे विश्रांतवाडी भागात एका पादचारी तरुणाला मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील पावणेचार लाखांची सोनसाखळी हिसकावून नेली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास विश्रांतवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून जात असताना, एकाने त्याला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाण करून त्याच्या गळ्यातील तीन लाख ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लोहकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
हडपसर घरफोडीचा 24 तासांत छडा:उत्तर प्रदेशातील चोरट्याला अटक, साडेतीन लाखांचे दागिने जप्त