Headlines

हिम्मत असेल तर राजीनाम्याची तयारी दाखवा- संधान:कोपरगावात सत्ताधाऱ्यांनी मांडला चार महिन्यांच्या कारभाराचा लेखाजोखा; विकासकामांचा वाचला पाढा‎




कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपल्या चार महिन्यांच्या कामकाजाचा लेखाजोखा जाहीर केला. माजी आमदार स्नेहलता कोल्हे व आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांना चोख उत्तर देत राजीनाम्याचे खुले आव्हान दिले. नगराध्यक्ष संधान म्हणाले की, आम्ही सत्तेत आल्यानंतर आरोग्य सभापती वैभव आढाव यांनी प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबवले आहे. घंटागाड्यांची संख्या आणि मनुष्यबळ वाढवून नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. गेल्या चार महिन्यांत शहरात ७२६ ढापे टाकण्यात आले असून, स्ट्रीटलाईट आणि हायमॅक्स बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. याशिवाय शहरात वर्षातून सात ते आठ वेळा फवारणी करण्याचे नियोजन नवीन टेंडरमध्ये केले आहे. मागील कारभारामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनतेला ७ कोटींहून अधिक रुपयांचा दंड सोसावा लागला आहे, अशी माहिती त्यांनी घरपट्टी, पाणीपट्टी व वीजबिल थकबाकीचा तपशील देताना दिली. लवकरच शहरात अद्ययावत स्वच्छतागृहे बसवण्यात येणार असून ७५ टॉयलेट मंजूर झाले आहेत. विरोधक चार महिन्यांतच हिशोब मागत आहेत, त्यांनी आधी स्वतःच्या कथित चार हजार कोटींच्या कामांचा हिशोब द्यावा, असे संधान म्हणाले. या पत्रकार परिषदेला बबलू वाणी, अतुल काले, विनोद राक्षे, संदीप देवकर, अनिल आव्हाड यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. आमच्या कारभारात गैर आढळल्यास पायउतार होऊ सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेचा नगराध्यक्ष पराग संधान यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. विरोधकांनी केवळ चार महिन्यांच्या काळात आमच्याकडे हिशोब मागण्यास सुरुवात केली आहे, मात्र त्यांनी स्वतः केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची हिंमत दाखवावी. आम्ही जनतेच्या दरबारात कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. जर आमच्या चार महिन्यांच्या कारभारात काहीही गैरप्रकार आढळला तर आम्ही तात्काळ राजीनामा देऊ, मात्र विरोधकांच्या कारभारात चुका आढळल्यास ते राजीनामा देणार का, असा थेट सवाल करत संधान यांनी विरोधकांना कोंडीत पकडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *