![]()
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग संयुक्तपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात शहरात एकाच वेळी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट आणि विनापरवाना धावणाऱ्या ५६ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करत ६५ हजार ५०० रुपयांचा ई-चलन व रोख दंड वसूल केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत शहर वाहतूक शाखेने भिस्तबाग चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक आणि प्रोफेसर चौक या प्रमुख ठिकाणांवर अचानक कडक नाकाबंदी केली. तसेच महामार्गांवर अवजड वाहनांची तपासणी करणारी आरटीओची तीन भरारी पथके आता शहरातील अंतर्गत वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणार आहेत. आगामी काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कागदपत्रे, परवाना , विमा पावती आणि आरसी बुकची कसून तपासणी केली जाईल. कागदपत्रे अपूर्ण असल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला. विनाहेल्मेट पोलिसांनाही दंड पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस दलासाठी मोटारसायकलवर हेल्मेट अनिवार्य केले आहे. वाहतूक शाखेने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि मोटार परिवहन विभागाच्या प्रवेशद्वारावरच रोज सकाळी ९ ते ११ नाकाबंदी सुरू केली आहे. ‘खाकी’चा मुलाहिजा न ठेवता ३ दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३४ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर कारवाई करत ३४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Source link
बेशिस्त वाहनचालकांसह पोलिसांनाही ठोकला दंड:एसपी ऑफिससह प्रमुख चौकांत नाकाबंदी