Headlines

कॉकरोच जनता पार्टीवर मुनगंटीवारांचा निशाणा; आचारसंहितेलाही ठरवलं नवा गब्बरसिंग:सीजेपीच्या आंदोलनावरही स्पष्ट भूमिका




चंद्रपूरमध्ये बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तसेच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर सविस्तर भाष्य केले. नीट परीक्षा प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे या पक्षाची चर्चा देशभर होत असताना मुनगंटीवार यांनी सामान्य नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमधूनच अशा प्रकारच्या चळवळी निर्माण होतात, असे मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयात किंवा सार्वजनिक जीवनात बोलताना शब्दांचा वापर अत्यंत जबाबदारीने झाला पाहिजे, अन्यथा तरुणांच्या मनात असंतोष निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. कॉकरोच जनता पार्टीच्या उदयाबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, देशातील तरुणांना कमी लेखणारी किंवा त्यांची तुलना अपमानास्पद शब्दांशी करणारी भाषा वापरली गेल्यास त्याची प्रतिक्रिया समाजात उमटते. अशाच भावना तरुणांच्या मनात निर्माण झाल्यामुळे या नव्या प्रयोगाचा जन्म झाला आहे. मात्र केवळ आंदोलन किंवा नाराजी यावर पर्याय उभा राहत नाही. त्यासाठी मजबूत संघटनात्मक रचना, विचारसरणी आणि कार्यपद्धती आवश्यक असते. भाजपने त्याग, तपस्या आणि बलिदानाच्या आधारावर आपली उभारणी केली आहे. त्यामुळे अशा नव्या प्रयोगांना राजकीय पर्याय म्हणणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सर्वांना शब्दांची काळजी घेण्याचा सल्ला दिला. सामान्य माणसाच्या भावना दुखावतील अशी भाषा सार्वजनिक मंचावर वापरणे टाळले पाहिजे, असे ते म्हणाले. एखाद्या वक्तव्यामुळे लोकांच्या मनात असंतोष निर्माण झाला तर त्यातून नवीन प्रकारच्या चळवळी उभ्या राहतात. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सीजेपीच्या प्रयोगातून सर्वांनी धडा घ्यावा आणि अशा परिस्थितीला कारणीभूत ठरणारी वक्तव्ये टाळावीत, असेही त्यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांना प्रत्येकी 5 लाख रुपये वाटल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. या आरोपावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचा संदर्भ दिला. शिवाजी महाराजांनी निष्ठा आणि मूल्यांची शिकवण दिली होती. जर कार्यकर्ते पैशासाठी प्रभावित होत असतील तर त्यांना निष्ठेचे धडे कोणी द्यायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रलोभनाने विचलित करता येत नाही, असा दावा करत त्यांनी सर्व पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजवली पाहिजे, असे मत व्यक्त केले. आचारसंहितेचा अतिरेक झाला तर आचारसंहितेवर बोलताना मात्र मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर बैठका घेणेही कठीण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आचारसंहिता म्हणजे जणू ‘शोले’ चित्रपटातील नवा गब्बरसिंगच असल्याची उपमा देत त्यांनी टीका केली. नगरसेवक हे विशिष्ट पक्षांशी बांधील असताना सामान्य लोकांच्या कामांवर निर्बंध आणण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अशा प्रकारे आचारसंहितेचा अतिरेक झाला तर जनतेतूनही कधीतरी ‘जय-वीरू’ तयार होतील, असा इशाराही त्यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *