![]()
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूळ मूर्तींचे स्वरूप बदलू नये, तसेच संवर्धनाची प्रक्रिया दीर्घकाळ टिकावी, यासाठी पुरातत्त्व तज्ज्ञांकडून मूर्तींची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत हे संवर्धन कार्य केले जाईल
.
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासंदर्भात मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक महाराज मंडळी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक ५ जून रोजी दुपारी श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास येथे पार पडली. जिल्हाधिकारी तथा सल्लागार परिषदेचे पदसिद्ध सदस्य कार्तिकेयन एस. यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
या बैठकीस मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समिती व सल्लागार परिषदेचे सदस्य, स्थानिक महाराज मंडळी, तसेच पुरातत्त्व विभाग पुणे आणि छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुरातत्त्व विभागाने मूर्तींची तपासणी करून सादर केलेल्या अहवालावर मंदिर समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. संवर्धनासाठी शासनाची आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे. पुढील आठवड्यात पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ अधिकारी, स्थानिक महाराज मंडळी, मंदिर समिती व सल्लागार परिषदेचे सदस्य आणि विषयतज्ज्ञ यांच्या उपस्थितीत मूर्तींचे प्रत्यक्ष निरीक्षण केले जाईल.
संभाजीनगर पुरातत्त्व विभागामार्फत शास्त्रोक्त पद्धतीने प्रत्यक्ष काम करू : मूर्तींचे आयुष्य वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना निश्चित करून छत्रपती संभाजीनगर पुरातत्त्व विभागामार्फत प्रत्यक्ष काम सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
यापूर्वी चार वेळा पुरात्त्व सर्वेक्षणकडून झाले संवर्धन
मूर्तींची होणारी झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (छत्रपती संभाजीनगर) यांच्यामार्फत यापूर्वी १९८८, २००५, २०१२ आणि २०२० साली संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनाला जवळपास पाच वर्षे पूर्ण होत आल्याने, मूर्तींची विशेषतः श्रींच्या चरणभागाची पुन्हा काही प्रमाणात झीज होत असल्याचे निदर्शनास आले आहे.