Headlines

महायुतीत मानापमानाचे उड्डाण!:नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे फडणवीसांच्या हस्ते अनावरण; एकनाथ शिंदेंनाच निमंत्रण नाही




राज्यातील महायुती सरकारच्या अंतर्गत गोटात सातत्याने धुसफूस आणि शीतयुद्ध पाहायला मिळत असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी गेल्यानंतर अनेकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगतात. मात्र, आता थेट मुंबईच्या वेशीवर झालेल्या एका मोठ्या शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना देण्यात आलेले नाही. या नव्या प्रकारामुळे महायुतीमध्ये मानापमानाचे नाट्य रंगात येऊन वादाची मोठी ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात पुतळा साकारणारे शिल्पकार नितीन गोर्डे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, “नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत आम्ही ठाम आणि आग्रही आहोत,” असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. मात्र, या संपूर्ण सोहळ्याला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची लागलेली अनुपस्थिती सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चिली जात आहे. नगरविकास मंत्री असूनही डावलले; राजकीय हस्तक्षेपाची शंका हा कार्यक्रम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने (अदानी समूह) आयोजित केला होता. हे विमानतळ सिडकोच्या माध्यमातून उभारले जात आहे, जे थेट नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. नगरविकास विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून या कार्यक्रमाचे प्रमुख निमंत्रण एकनाथ शिंदे यांना असायला हवे होते. मात्र, एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाची साधी कल्पनाही देण्यात आली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मंत्री आदिती तटकरे यांना निमंत्रण होते, परंतु दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही निमंत्रणापासून लांब ठेवण्यात आले होते. त्यामुळे विमानतळ संचालन करणाऱ्या अदानी कंपनीकडून हा दुजाभाव झाला की यामागे कोणताही राजकीय हस्तक्षेप होता? शिंदेंना जाणूनबुजून डावलले गेले की ही केवळ अनावधानाने झालेली चूक होती? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. महायुतीमधील राजकीय तणाव वाढणार? एकनाथ शिंदे यांना अशा महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कार्यक्रमातून डावलल्यामुळे त्यांच्या समर्थक आणि राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. या घटनेमुळे महायुतीमधील अंतर्गत समन्वय आणि नेत्यांमधील संबंधांवर पुन्हा एकदा ताण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी काळात हा वाद काय वळण घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *