Headlines

'कॉकरोच जनता पार्टी'चे दिल्लीत जोरदार आंदोलन:CM फडणवीसांची 'अराजकता' म्हणत टीका, तर ठाकरेंचा सरकारला इशारा




सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना आकर्षित करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर थेट रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला ‘अराजकता पसरवण्याची मानसिकता’ म्हटले आहे, तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘कॉकरोचला कमी लेखू नका’ असा थेट इशारा सरकारला दिला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे अमेरिकेतून दिल्लीत दाखल होताच थेट जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी झाले. विमानतळावरून बाहेर पडताना त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र होते. त्यांच्या स्वागतासाठी आणि आंदोलनासाठी दिल्लीत हजारो तरुण एकत्र जमले होते. नीट पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करत आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. हा खरा अराजकतेचा चेहरा – मुख्यमंत्री फडणवीस या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, “जंतरमंतरवर ज्या प्रकारची भाषणे झाली आणि जसे नारे लावले गेले, त्यातून देशातील तरुणांची अभिव्यक्ती नाही, तर अराजकता पसरवण्याची मानसिकता दिसून आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हातात घ्यायचे आणि त्याच संविधानाने तयार केलेल्या संस्था व व्यवस्था उखाडून टाकण्याची भाषा करायची, हा ढोंगीपणा आहे.” संविधान हे केवळ पुस्तक नसून लोकशाहीच्या तत्त्वांचा गाभा आहे, असे नमूद करत देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की, “ही तत्त्वे नाकारणारे लोक पुस्तक घेऊन फिरले, तरी ते संविधानविरोधीच आहेत. आज या आंदोलनामुळे त्यांचा अराजकतेचा चेहरा देशासमोर उघडा पडला असून, त्यांना जनतेचे कोणतेही समर्थन मिळालेले नाही.” कॉकरोचला कमी लेखू नका – ठाकरे यांचा इशारा दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलक तरुणांची बाजू घेत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “ज्यांना आपण देशाचे भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना आणि भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात जंतरमंतरवर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉकरोच’ म्हणून हिणवणे आणि न्याय नाकारणे अत्यंत चुकीचे आहे. NEET पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून, हे सर्व पीडित तरुण आज आक्रोश करत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉकरोचला कमी लेखू नका, हाच इशारा या आंदोलनाने दिला आहे.” अभिजीत दिपके संभाजीनगरकडे रवाना एकीकडे दिल्लीत या आंदोलनावरून राजकीय वादळ उठले असताना, दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्या सुरक्षेची चिंता त्यांच्या कुटुंबीयांना लागली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज येथील त्यांच्या घराबाहेर आधीच तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील आंदोलन संपवून अभिजीत दिपके आता आपल्या आई-वडिलांच्या भेटीसाठी संभाजीनगरकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *