Headlines

नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कौशल्याभिमुख व्हा:सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांचे आवाहन




कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्रांतीमुळे ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या डेटा सेंटर्समुळे विजेची मागणी झपाट्याने वाढणार आहे. त्यानुसार आपली पायाभूत सुविधा व कौशल्य वाढवावे लागेल. कुशल मनुष्यबळामुळे माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा जसा फायदा देशाला झाला, तसाच एआय क्रांतीचा फायदा करून घ्यायचा असेल सर्व कर्मचाऱ्यांनी कौशल्याभिमुख व्हावे, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांनी केले. महावितरणचा 21 वा वर्धापन दिन छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक व परिमंडल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदित्य जीवने (भाप्रसे) बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर होते. यावेळी अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, महेश पवार, विजय मोरे, बीना सावंत, शुभांगी कटकधोंड, सहायक महाव्यवस्थापक शंकर कुलकर्णी, शिल्पा काबरा यांची प्रमुख उपस्थिती होती. सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) म्हणाले की, जगभर नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढतोय. देशाची स्थापित वीज निर्मिती क्षमता 500 गिगावॅटवर गेली असून त्यात नवीकरणीय ऊर्जेचा 52 टक्के वाटा आहे. त्यात महावितरणचेही मोठे योगदान आहे. मात्र नवीकरणीय ऊर्जेचे महावितरणच्या यंत्रणेशी एकात्मीकरण करावे लागणार आहे. आज तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. या बदलाशी सुसंगत असे मनुष्यबळ व कौशल्यांचे अद्ययावतीकरण करून ऊर्जा क्षेत्रात नवीन काय सुरू आहे याकडे लक्ष द्यावे लागेल. कौशल्यांचे एकात्मीकरण हे आता माणसाचे सर्वात मोठे कौशल्य आहे, असे जगप्रसिद्ध लेखक युवाल नोआ हरारी यांनी म्हटले आहे. कौशल्याभिमुखता हा गुण दैनंदिन कामकाजाबरोबर वैयक्तिक आयुष्यातही उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे स्वयंप्रेरणेने काम करून ग्राहकांचा आपल्यावरचा विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन जीवने यांनी केले. या प्रसंगी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर म्हणाले की, महावितरणने 21 वर्षांत केलेली प्रगती उल्लेखनीय असून स्पर्धेच्या युगात सक्षम होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने काम करणे काळाची गरज आहे. चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वत:पासून करा. संकल्पाला कृतीची जोड द्या. ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा व सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी केले. वर्धापन दिन कार्यक्रमात सर्वांनी सुरक्षा शपथ घेतली. मेडीकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच कार्यालयाच्या आवारात आयुर्वेदिक वनस्पतींचे रोपण करण्यात आले. कार्यक्रमाला महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *