Headlines

कन्हान नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू:कामठी येथे सहलीचा दुर्दैवी शेवट, 6 वर्षांच्या बालकाचाही समावेश




नागपूरजवळील कामठी परिसरात कन्हान नदीच्या पात्रात रविवारी दुपारी एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा वर्षांच्या बालकाचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ६ वर्षीय चैतन्य बबलू अंबादे, ३१ वर्षीय गौतम राजकुमार अंबादे आणि ३३ वर्षीय रोहित कैलास नागदेवे यांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या जरीपटका भागातील अंबादे आणि नागदेवे कुटुंबातील काही सदस्य रविवारची सुटी साजरी करण्यासाठी कामठी येथील प्रसिद्ध शिवमंदिर परिसराजवळ कन्हान नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. तेथे ते सहलीचा आनंद घेत होते. दुपारी सुमारे १ वाजता नदीत उतरल्यानंतर पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील इतर सदस्यही पुढे सरसावले, मात्र पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे आणि दलदलीमुळे एकापाठोपाठ एक तिघे जण खोल पाण्यात वाहून गेले. नदीकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या इतर लोकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करत मदतीचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक मच्छीमार आणि बचाव पथकाच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *