Headlines

इंडिया आघाडी विखुरलेली नाही:दिल्लीतील बैठकीत 23 पक्ष एकत्र येणार, आगामी निवडणुकांवर होणार चर्चा- संजय राऊत




आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून आगामी राजकीय रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक तयारीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, आजची बैठक अत्यंत महत्त्वाची असून ती आयोजित करण्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. ममता बॅनर्जी दिल्लीत दाखल झाल्या असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील बैठकीत सहभागी होणार आहेत. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय वाढवण्यासह आगामी निवडणुकांची दिशा या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. इंडिया आघाडी विखुरलेली नाही इंडिया आघाडी विखुरलेली नसून अधिक मजबूत होत असल्याचा दावा करत राऊत यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. मतांची हेराफेरी करणाऱ्या आणि लोकशाही संस्थांवर दबाव आणणाऱ्या सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी विरोधक एकत्र येत असल्याचे ते म्हणाले. या बैठकीत इंडिया आघाडीतील तब्बल २३ पक्षांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून आगामी राजकीय घडामोडींसाठी ही बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *