Headlines

जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशासाठी "वासुदेवाची' साद:विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीच्या मोहिमेचा शुभारंभ; प्रभातफेरी काढून जागर




जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसाठी जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे एका अनोख्या प्रवेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी चक्क ‘वासुदेवा’चे रूप धारण करून घरोघरी जात, पालकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचे भावनिक आणि प्रभावी आवाहन गायनाच्या माध्यमातून केले. पटसंख्या व गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम घेत लाखनवाडा गावातून प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. राज्याचे शिक्षण मंत्री यांनी २ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता व पटसंख्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी बुलडाणा जिल्ह्यात सुरू झाली असून, लाखनवाडा गावातील हा उपक्रम या मोहिमेचा पहिला टप्पा ठरला आहे. या अनोख्या मोहिमेदरम्यान शिक्षण विभागाच्या वतीने सर्व पालक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर १०० टक्के विश्वास ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीची शाश्वती विभागाकडून गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांनी दिली. या कार्यक्रमासाठी लाखनवाडा येथील जिल्हा परिषद मराठी, उर्दू व हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले. बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी नुकतेच एन.एम. एम.एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच, नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या ८० पैकी तब्बल ३८ विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळांमधील आहेत, ही जिल्ह्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब असून शिक्षक घरोघरी येऊन प्रवेशासाठी जे अथक प्रयत्न करत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना दाद देत पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच निश्चित करावा. -विकास पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *