- Marathi News
- National
- Monsoon Will Arrive In Mumbai In 48 Hours; Possible In Marathwada After 5 Days, Monsoon Will Move Towards Mumbai After Talkonkan
नवी दिल्ली27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

धाराशिवमध्ये कळंब-लातूर महामार्गावरील पुलाचा भराव असा वाहून गेला.
मान्सूनने सोमवारी १३ व्या राज्यात, तेलंगणात प्रवेश केला. या आधी मान्सून पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्राच्या रत्नागिरीतील हरणाई बीच ओलांडून मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून कर्नाटक, महाराष्ट्राच्या इतर भागात पुढे सरकणार असून ५ ते ७ दिवसांत मराठवाड्यात दाखल होईल, तर १० दिवसांत विदर्भात पोहोचेल.
मान्सून सोमवारी दुपारपर्यंत मुंबईपासून १५० किमी दूर होता. पुढील २४ ते ४८ तासांत तो मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मान्सूनचा प्रवास वेळेनुसार सुरळीत आहे. परंतु मान्सूनचा महाराष्ट्रातील पुढील प्रवास याच गतीने होईल याची शक्यता कमी असल्याचा अंदाज आदल्या दिवशी राज्याच्या कृषी विभागाने वर्तवला होता.दरम्यान, ११ जूनपर्यंत मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीड जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील ४१ पैकी २१ मंडळांत अतिवृष्टी
बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील होळ मंडळात रविवारी रात्रीनंतर ८५.३ मिमी पावसाची नोंद झाली, तर धाराशिवला सोमवारी पहाटेपर्यंत साडेसहा तास मुसळधार पाऊस बरसला. जिल्ह्यातील ४१ पैकी २१ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. परंडा तालुक्यातील केळी, पपई बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
दुष्काळाचा धोका टळला का?
1. हवामान संस्थांच्या अंदाजाचे काय झाले? बहुतांश संस्था एल निनो कमकुवत होण्याच्या वेळेचा (ट्रान्झिशन फेज) अचूक अंदाज लावू शकल्या नाहीत. प्रशांत महासागरात अपेक्षेपेक्षा वेगाने झालेल्या बदलामुळे मान्सूनच्या सुरुवातीला याचा नकारात्मक परिणाम दिसत नाही. 2. भविष्यात दुष्काळाची काही शक्यता आहे? सध्या स्थिती अनुकूल आहे, परंतु ला-निनाची संथगती व ऑगस्टमध्ये संभाव्य इंडियन ओशन डायपोलच्या (आयओडी) स्थितीवर लक्ष ठेवावे लागेल, जे नंतरच्या महिन्यांत पाऊस निश्चित करतील.
मान्सून अपडेट
केरळम, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू, आंध्र, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल, आसाम, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि तेलंगणा असा नैऋत्य मान्सूनचा आतापर्यंतचा प्रवास आहे.