Headlines

500 टक्के नफ्याचे आमिष दाखवून 83.80 लाखांची फसवणूक:पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी गोवा-कोलकातामधून दोघांना अटक




विदेशी शेअर मार्केटमध्ये 500 टक्के नफ्याचे आमिष दाखवून एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाची 83 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या प्रकरणी गोवा आणि कोलकाता येथून दोन आरोपींना अटक केली आहे. अभिषेक मोहन आचरेकर (वय 34, रा. गोवा) आणि अनमोल शर्मा (वय 32, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराला विदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा केले. आरोपींनी ही रक्कम अनेक बँक खात्यांमध्ये घेतल्याचे तपासात समोर आले आहे. आर्थिक आणि तांत्रिक तपासादरम्यान, 21 मार्च 2026 रोजी तक्रारदाराकडून 30 लाख रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका खात्यात जमा झाल्याचे पोलिसांना आढळले. हे खाते ‘शिवशक्ती एंटरप्रायझेस’ या नावाने होते आणि त्यात संबंधित व्यक्तींची भागीदारी असल्याचे निष्पन्न झाले. खातेदार अभिषेक आचरेकर याचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात आला. आचरेकरची चौकशी केली असता, त्याने कोलकात्यातील साथीदार अनमोल शर्माच्या मदतीने फसवणुकीची रक्कम स्वीकारल्याची कबुली दिली. त्यानंतर अनमोल शर्माचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन त्याला कोलकाता येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आले. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या टोळीने सामान्य नागरिक, विशेषतः महिलांना कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 60 ते 70 बँक खाती मिळवली होती. या खात्यांचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम घेण्यासाठी करण्यात आला होता, असे पोलिसांनी सांगितले. अशा खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील कलम 318(4), 316(2), 340, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66(सी), 66(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *