![]()
शिक्षक दिन होऊन दोन महिने उलटले, तरी राज्य आणि जिल्हा शिक्षक पुरस्कारांची अंतिम यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे पुरस्कारासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तरी तारीख ठरणार का, असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. राज्य शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा आणि राज्यस्तरावरील मुलाखती १२ ऑगस्ट २०२६ रोजी पूर्ण झाल्या. त्यानंतर अंतिम यादी लवकर जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन होऊनही यादी प्रसिद्ध झालेली नाही. अमरावती जिल्ह्यात प्राथमिक विभागातून १४ शिक्षकांची, तर माध्यमिक विभाग आणि दिव्यांग शिक्षकांमधून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड केली जाते. निवड यादीला विभागीय आयुक्तांची मंजुरी घेतली जाते. त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेते. यंदा मात्र निवड यादी आणि कार्यक्रमाची तारीख जाहीर झालेली नाही. गेल्या वर्षी २०२४-२५ च्या राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा ५ सप्टेंबर २०२५ रोजी झाली होती. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम १८ सप्टेंबर २०२५ रोजी झाला होता. यंदा घोषणा रखडल्याने शिक्षकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार या नावाने दिला जातो. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण ५ सप्टेंबर रोजी होते. शिक्षक दिनी गुणवंत शिक्षकांचा गौरव केला जातो, मात्र यंदा राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा झालेली नाही. प्राथमिक शिक्षक समितीचे राजेश सावरकर म्हणाले, “पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करून निवड प्रक्रियेत सहभागी झालेल्या शिक्षकांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. शालेय शिक्षण विभागाने अंतिम निवड यादी जाहीर करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि वेळापत्रक स्पष्ट करावे.”
Source link
शिक्षक पुरस्कारांची अंतिम यादी दोन महिने रखडली:शिक्षक दिनानंतरही राज्य आणि जिल्हा पुरस्कारांची घोषणा नाही; निवड प्रक्रियेत सहभागी शिक्षकांनी वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली