![]()
भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी कुणाल भागवत माने (वय २३) याला अटक केली. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा कट्टा जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत २०२४मध्ये दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी अभय ऊर्फ अब्या संतोष राचूरकर (वय २५) याला पकडून सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कुणाल माने आंबेगाव बुद्रुक, पुणे येथे राहतो. त्याचे मूळ गाव कडेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित धुमाळ यांचे पथक गस्त घालत असताना पोलिस अंमलदार सचिन पवार आणि अभिनव चौधरी यांना माहिती मिळाली. भारती विद्यापीठ कॅम्पसजवळील आंबेगाव बुद्रुक परिसरात आयडिया गॅलक्सी दुकानाच्या फलकाजवळ एक तरुण संशयास्पदरीत्या थांबल्याची माहिती बातमीदाराने दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कुणाल माने याला ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा आढळला. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पथकात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रंगराव पवार, संतोष जाधव, उपनिरीक्षक अमित धुमाळ, पोलिस अंमलदार अभिनव चौधरी, सचिन सरपाले, नीलेश खैरेमोडे, किरण बाटे आणि मंगेश गायकवाड यांचा समावेश होता. दुसऱ्या कारवाईत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अभय ऊर्फ अब्या संतोष राचूरकर याला त्याच्या घरातून पकडले. तो वडगाव बुद्रुकमधील बेस्ट स्टॉपजवळ राहतो. त्याच्याविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात २०२४मध्ये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखा युनिट तीनच्या हद्दीतील फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. त्यानुसार पोलिस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण आणि योगेश झेंडे सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. अभय घरी आल्याची माहिती त्यांना बातमीदाराकडून मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात त्याच्या घराभोवती पाळत ठेवली. अभय घराबाहेर येण्याची वाट न पाहता पोलिसांनी घरात प्रवेश करून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला सिंहगड रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Source link
पुण्यात गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत:भारती विद्यापीठ परिसरातून 50 हजारांचा कट्टा जप्त; दुसऱ्या प्रकरणात 2024च्या गुन्ह्यातील फरार आरोपी पकडला