Headlines

खेत बचाओ अभियानांतर्गत गेवराई सेमी येथे शेतकऱ्यांसाठी मेळावा:पीक संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, कृषी योजनांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎




बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने वाढत असताना पिकांचे रोग व किडींपासून संरक्षण, उत्पादन खर्चात बचत आणि शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील शास्त्रज्ञ डॉ. जिंतूरकर यांनी केले. त्या गेवराई सेमी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित खेत बचाओ अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पीक संरक्षण, रोग व कीड व्यवस्थापन, शासकीय कृषी योजना तसेच हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. जिंतूरकर यांनी विविध पिकांवरील रोग व किडींची लक्षणे, त्यांचे वेळेवर निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती याबाबत सखोल माहिती दिली. अनावश्यक रासायनिक फवारण्या टाळून शिफारशीनुसार औषधांचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होतो तसेच पर्यावरणाचे संरक्षण होते, असे त्यांनी सांगितले. याशिवाय मृदा परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, सेंद्रिय घटकांचा वापर आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मंडळ कृषी अधिकारी विनोद मोरे यांनी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली. उपकृषी अधिकारी परीक्षित पाटील यांनी पोखरा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध घटक, अनुदाने व लाभ यांची माहिती दिली. तसेच खरीप हंगाम २०२६ मोहिमेअंतर्गत बियाणे प्रक्रिया, मृदा परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, पीक संरक्षण उपाययोजना, पीकनिहाय शिफारशी तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. महालिंग कुंभार यांनी आत्मा अंतर्गत राबविण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी अभ्यास दौरे, शेतकरी गटांची निर्मिती तसेच विविध कृषी विकास उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास गेवराई सेमी गावाचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, कृषी मित्र बाबुराव ताठे, शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *