![]()
मुंबई महापालिकेत अवघ्या सहा महिन्यांतच पदाधिकाऱ्यांसाठी पुन्हा नवीन आणि अधिक महागड्या गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. जानेवारी महिन्यात पालिकेने पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी ‘स्कॉर्पिओ’ गाड्या खरेदी केल्या होत्या. मात्र त्या सोयीच्या नसल्याचे कारण देत आता सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाड्या घेण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाकडून तयार केला जात असलेला हा नवा खरेदी प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पाठवला जाणार असून, यामुळे पालिकेच्या या निर्णयाची सध्या मोठी चर्चा होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतर विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्याने सध्या तिथे नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. या नव्या पदाधिकाऱ्यांच्या दिमतीला पालिकेकडून नवी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून, महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी तब्बल 30 ते 35 लाख रुपये किमतीची ‘इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड’ गाडी देण्यात आली आहे. दुसरीकडे, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि इतर समिती अध्यक्षांना ‘स्कॉर्पिओ’ गाड्या देण्यात आल्या आहेत. मात्र, पालिकेने दिलेल्या या ‘स्कॉर्पिओ एन’ गाड्या प्रवासासाठी अजिबात सोयीच्या नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे. किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील एक विधान केले आहे. त्या म्हणाल्या, मी याबाबत दोन तीन गोष्टीवर प्रकाश टंकेन. यात 54 गाड्या घेतल्या. काही गाड्या वॉर्ड अध्यक्ष यांना दिल्या. आयुक्त यांना देखील गाड्या यातीलच दिल्या आहेत. आम्हाला ज्या गाड्या दिल्या तिचे अॅवरेज 7-8 आहे. गाडी बरोबर नाही, पाठ दुखे असे काहीजण म्हणत आहेत. गाडी मुंबईच्या बाहेर न्यायची असते तेव्हा आयुक्त यांची परवानगी लागते. पालिकेची लूटमार योग्य नाही मी महापौर असताना दोन वेळा गाडी बाहेर घेऊन गेले होते. आता मी बाहेर गाडी घेऊन जात नाही. तसेच अशा पद्धतीने पालिकेची लूटमार करत असतील तर ते योग्य नाही. तसेच आयुक्त यांचे लाड पुरवायला बसले आहेत का? असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे. निर्णय घेताना आम्हाला विश्वासातही घेतले जात नाही मुंबई महापालिकेत पदाधिकाऱ्यांसाठी नवीन गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावासह मानधनाच्या मुद्यावरून किशोरी पेडणेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापावरांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला दरमहा पन्नास हजार रुपये, तर नगरसेवकांना अवघे पंचवीस हजार मानधन दिले जात आहे. शिवाय कोणतेही निर्णय घेताना आम्हाला विश्वासातही घेतले जात नाही, असा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. ‘स्कॉर्पिओ’ गाड्यांचा वापर सोयीचा नसल्याचे सांगत त्यामागे ब्रँड बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. तसेच, आधीचे महापौर ज्या पद्धतीने काम करायचे, त्या तुलनेने सध्याच्या पदाधिकाऱ्यांचे भरभक्कम मानधन आणि प्रसिद्धीसाठी होणारा भरसक खर्च अन्यायकारक असल्याची खरमरीत प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Source link
6 महिन्यांतच गाड्यांचा कंटाळा?:मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आता हवी 'इनोव्हा', पालिकेची लूटमार योग्य नाही- पेडणेकर