Headlines

सातबारा उताऱ्यावर नाव लावून देण्याच्या आमिषाने 26 लाखांची फसवणूक:एकाविरुद्ध मांजरी पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू




सातबारा उताऱ्यावरून कमी झालेले नाव पुन्हा लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी प्रसाद उद्धव शिरसाठ (वय 50) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे नाव त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावरून कमी झाले होते. 2022 मध्ये त्यांची आरोपी प्रसाद शिरसाठ याच्याशी ओळख झाली. शिरसाठने महसूल विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे भासवले. सातबारा उताऱ्यावर नाव पुन्हा लावण्यासाठी पैसे लागतील असे सांगून, त्याने गेल्या चार वर्षांत तक्रारदाराकडून वेळोवेळी 26 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. अनेकदा पैसे देऊनही आरोपीने सातबारा उताऱ्यावर नाव लावून दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत विचारणा केली असता, आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदाराने आपले पैसे परत मागितले असता, आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नवनाथ बिनवडे करत आहेत. सोसायटीच्या कार्यालयात चोरी पुणे शहरात कर्वेनगर भागातील एका सोसायटीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारे डीव्हीआर यंत्र चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर भागात आनंद निकेतन सोसायटी आहे. 28 जुलै रोजी मध्यरात्री सोसायटीच्या आवारातील कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारे डीव्हीआर यंत्र, दोन जुन्या बॅटऱ्या चोरुन नेल्या. चोरलेल्या डीव्हीआर यंत्राची किंमत 13 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक एन साठे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *