Headlines

श्रींच्या तीर्थक्षेत्रीय सप्ताहाकरिता पैठणला भाविकांची मांदियाळी:श्री ज्ञानेश्वरी व भावार्थ रामायणाचे ज्ञान सप्ताहाचा श्रीगणेशा‎




तीर्थ यात्रे सुखे जाऊ । वाचे विठ्ठलनाम घेऊ । संता संगे सेऊ । वासुदेव धणीवरी ॥ या अभंगोक्तिनुसार प्रतिवर्षी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्रीक्षेत्र श्रद्धासागर, अकोटद्वारे एका तीर्थक्षेत्रावर जाऊन श्रींच्या तीर्थक्षेत्रिय ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावर्षी श्रीक्षेत्र पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात सप्ताहाचा श्रीगणेशा झाला. पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी झाली. श्री संत एकनाथ महाराजांचा दरबार, श्री संत वासुदेव महाराज यांचा संत संग आणि अधिक मास या त्रिवेणी संगमामुळे ही गर्दी वाढती असल्याचे श्री संस्थेद्वारा सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोट व तेल्हारा आगारद्वारे विशेष यात्रा बस सोडण्यात आल्या होत्या. श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे या सर्व बसचे पूजन व सर्व चालक व वाहकांचे श्री संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे महादेवराव ठाकरे, पुरुषोत्तम लाजूरकर, अनिल कोरपे यांनी स्वागत करून वारकरी पताका दाखवून बसला प्रस्थानाचा झेंडा दाखवला. या बसद्वारा व स्वतंत्र वाहनाद्वारे आलेले भाविक यांमुळे ही गर्दी अधिकच वाढली आहे. सकाळच्या सत्रातील ११ वाजताच्या ज्ञानेश्वरी व भावार्थ रामायण प्रवचनाच्या सत्रात उमेश महाराज मोहोकार यांनी दोन्ही ग्रंथांवर निरूपण केले. श्री संत एकनाथ महाराजांच्या दरबारात त्यांच्याच भावार्थ रामायणावर होत असलेली प्रवचने विशेष आकर्षण ठरत आहेत. पहाटे ४ ते दुपारी १ वाजेपर्यंत असा भरगच्च कार्यक्रम पहिल्याच दिवशी संपन्न झाला. दुपार व सायंकाळच्या सत्रात अन्नदात्यांनी आपली सेवा श्रींचरणी अर्पण केली. सप्ताह वासुदेवराव महाराज महल्ले, महादेवराव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात होत आहे. सप्तहाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी पहाटे ४ वाजता ब्रह्ममुहूर्तावर श्रींचा अभिषेक तसेच आरती संपन्न झाली. त्यानंतर सकाळी ६ वाजता श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वैष्णवांच्या भजनानंदात “सद्गुरु श्री संत वासुदेवजी महाराज यांच्या रजत पादुका व मुखवट्याचे’ श्री संत एकनाथ महाराज यांच्या मंदिरात आगमन झाले. श्रींच्या मंदिरात सदर पादुकांचे पूजन व दर्शन सोहळा पार पडला. तद्नंतर विधिवत तीर्थ स्थापना व “राम कृष्ण हरी’ वीणा आरंभ होऊन अंबादास महाराज मानकर यांच्या व्यासपीठ नेतृत्वात ज्ञानेश्वरी पारायणाला आरंभ झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *