Headlines

‘अपघात मुक्त अकोला’साठी 46 ठिकाणी नाकाबंदी केंद्र:पोलिस अधीक्षक कार्यालयात रस्ता सुरक्षा बैठकीत निर्णय‎




जिल्हा पोलिस व संबंधित विभागांच्या वतीने मंगळवारी ९ जून रोजी सकाळी पोलिस अधीक्षक कार्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अपघात व रस्ता सुरक्षा विषयक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यात अपघात कमी करण्यासाठी ‘अपघात मुक्त अकोला’ हे अभियान राबवण्यात येणार असून, यासाठी जिल्ह्यामध्ये दोन सत्रांत ४६ ठिकाणी नाकाबंदी केंद्राची उभारणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या बैठकीला महामार्ग पोलिस प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक लोहित मताणी मार्गदर्शक म्हणून, तर अकोल्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आरटीओ निरीक्षक मनोज शेळके यांनी केले. लोहित मताणी यांनी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती वाढवण्याची गरज, महामार्गावरील अपघातांची कारणे व वाहतूक नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीवर मार्गदर्शन केले. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ‘अपघात मुक्त अकोला’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व यंत्रणा व नागरिकांनी समन्वय राखण्याचे आवाहन देखील या वेळी पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन, असे एकूण ४६ नाकाबंदी पॉइंट्स निश्चित करण्यात आले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. सकाळ, संध्याकाळी अंमलबजावणी होणार ही नाकाबंदी सकाळी ६ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत झिगझॅक पद्धतीने बॅरिकेडिंग करून केली जाणार आहे. यावेळी पोलिस अधिकारी व अंमलदार रेडियम बॅटन व रिफ्लेक्टर जॅकेटचा वापर करतील. या दरम्यान १००० वाहनांची ड्रंक अँड ड्राइव्ह तपासणी, विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *