![]()
रिपब्लिकन पक्षाची (आरपीआय) विचारधारा आणि सामाजिक न्यायाची चळवळ ख्रिश्चन समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आरपीआयने ख्रिश्चन आघाडीची स्थापना केली आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे हा या आघाडीचा मुख्य उद्देश असून, आरपीआयचे नेते बाळासाहेब जानराव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पत्रकार परिषदेला आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, नगरसेविका हिमानी कांबळे, आरपीआय ख्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी यांच्यासह ख्रिश्चन आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. जानराव यांनी सांगितले की, संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आरपीआय सातत्याने संघर्ष करत आहे. या संघर्षात ख्रिश्चन समाजाचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि त्यांच्या प्रश्नांना संघटितपणे वाचा फुटावी, हा आघाडी स्थापनेमागील प्रमुख उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समानता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी सर्व धर्मीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, ख्रिश्चन आघाडीच्या माध्यमातून समाजातील युवक, महिला आणि विविध घटकांना नेतृत्वाची संधी मिळेल. यामुळे समाजाचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल. जानराव यांनी नमूद केले की, आजही ख्रिश्चन समाजातील मोठा वर्ग केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांपासून अनभिज्ञ आहे. माहितीच्या अभावामुळे पात्र असूनही अनेक नागरिक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. ख्रिश्चन आघाडीच्या माध्यमातून समाजातील लोकांपर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहोचविणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे तसेच विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आरपीआय ख्रिश्चन आघाडीचे अध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी यांनी सांगितले की, ख्रिश्चन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सक्षमीकरणासाठी ही आघाडी पूर्णपणे कटिबद्ध आहे. समाजातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने स्थापन केलेली ही ख्रिश्चन आघाडी समाजाच्या कल्याणासाठी आणि त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडण्यासाठी पूर्ण बांधिलकीने कार्य करेल, असेही राजमनी यांनी स्पष्ट केले.
Source link
आरपीआय ख्रिश्चन आघाडीची स्थापना:समाजाला पक्षाची ताकद मिळावी; बाळासाहेब जानराव यांची माहिती