![]()
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षाच्या जडणघडणीत अनेक दिग्गज नेते व कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. 27 वर्षांपूर्वी स्वाभिमानातून स्थापन झालेल्या या पक्षाचा आजचा वर्धापन दिन अत्यंत भावनिक असून, सर्वांचे नेते अजितदादा आज आपल्यात नसल्याने त्यांच्याविना साजरा होणारा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, अजितदादांना नेहमीच विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता, या त्यांच्या ध्येयाची आठवण सांगताना सुनेत्रा पवार अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून वेगळ्या परिस्थितीत मी जबाबदारी घेतली आहे. येणाऱ्या सगळ्या गोष्टींची मला जाणीव होती. पदाधिकारी कार्यकर्ता आणि त्यांची निष्ठा माझ्या लक्षात आहे. योग्यवेळी संधी दिली जाईल. आतापर्यंत जे घडले ते मी समजून घेतले. मी पक्षाचा हिताला प्राधान्य देईल. कुणाचा हस्तक्षेप असेल तर मी लक्ष देईल. दादा ज्याप्रमाणे कडक निर्णय घ्यायचे तो माझा स्वभाव नसला तरी मी तो निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. अजितदादांना जो ‘विकसित महाराष्ट्र’ अपेक्षित होता, तेच ध्येय समोर ठेवून आपण अविरत काम करत राहू, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुरोगामी विचारधारा पुढे घेऊन जाणे म्हणजेच समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालणे होय, असे त्या म्हणाल्या. ग्रामीण तसेच शहरी भागात पक्षाची ताकद अधिक वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून संघटना मजबूत करणे अत्यंत गरजेचे आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा संघटनेचा ऑक्सिजन असून, सर्वांनी आपला लोकसंग्रह वाढवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आपला एकही मतदार आणि कार्यकर्ता मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतानाच, बूथ पातळीवर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा योग्य सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही देखील सुनेत्रा पवार यांनी दिली.
Source link
अजितदादांविना पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन…:सुनेत्रा पवार भावुक, म्हणाल्या- पक्षाच्या हितासाठी दादांसारखेच कठोर निर्णय घेणार