![]()
इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव परिसरात भात लागवडीपूर्वीची शेतीची तयारी पूर्ण झाली असून शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच लागवडीच्या कामांना वेग येणार असल्याने बळीराजाचे लक्ष मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे
.
जून महिना सुरू होताच तालुक्यात खरीप हंगामातील कामांना सुरुवात होते. यंदाही शेतकऱ्यांनी शेतांची नांगरणी, बांधबंदिस्ती तसेच लागवडीपूर्वीची आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकांची उभारणी करण्यात आली असून योग्य पावसाची प्रतीक्षा केली जात आहे.
मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव परिसरातील भात उत्पादक शेतकरी लागवडीसाठी सज्ज झाले असले, तरी समाधानकारक पावसाअभावी प्रत्यक्ष लागवड सुरू झालेली नाही. वेळेत पाऊस न झाल्यास लागवडीला विलंब होऊन संपूर्ण पीक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बदलत्या हवामानामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत असून कृषी विभागाकडून वेळोवेळी मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामातील हा महत्त्वाचा टप्पा असल्याने पुढील काही दिवसांतील पावसाची स्थिती निर्णायक ठरणार आहे.
खरिपाची मशागत पूर्ण इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव परिसरात शेतकऱ्यांनी भात लागवडीपूर्वीची मशागत पूर्ण केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकांची तयारीही करण्यात आली असून समाधानकारक पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. वेळेत पाऊस झाल्यास लागवडीच्या कामांना वेग येणार असून संपूर्ण खरीप हंगामाचे नियोजन सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तर पाऊस लांबल्यास लागवडीला विलंब होऊन शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.