Headlines

IAS तुकाराम मुंढेंचा गुटखा माफियांवर दणका:राज्यात अवैध गुटखा विक्रेत्यांवर थेट 'मकोका' लावण्याचे आदेश, काय म्हणाले मुंढे?




अन्न व औषध प्रशासनाचे सूत्र हाती घेतल्यानंतर आयएएस तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. अनेक ठिकाणी छापे मारून अवैध गुटखा, पान मसाले जप्त केले आहेत. तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या संपूर्ण कारवाई प्रकरणी मुंढे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात गुटखा बंदी केली आहे. आपल्या एफएसएसआयच्या सेक्शन 3 नुसार प्रतिबंधित जे खाद्य पदार्थ आहेत, गुटखा किंवा तत्सम प्रकार जे आहेत त्यावर बंदी आहे. त्यावर आपण अनेकवेळा कारवाई करतो. छापे टाकतो, कारवाई करतो, अनेकांना जेल होते. परंतु, प्रतिबंधित असूनही अनेक ठिकाणी गुटखा विकला जातो आणि खाल्लाही जातो. मग यावर पर्याय काय आहे? जे उत्पादक आहेत ते बाहेरचे आहेत. त्यामुळे इथे जे विक्री करणारे आहेत, ट्रान्सपोर्ट करणारे आहेत, डीलर आहेत, हे एक रॅकेट आहे आणि हे उद्ध्वस्त करण्यासाठी स्ट्रॉंग स्टँड घेणे गरजेचे आहे, यावर शासन पोहोचले आहे. मकोका लावण्याचे आदेश पारित पुढे बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले, हे पदार्थ आरोग्याला हानिकारक आहेत आणि तरी सुद्धा अशा प्रकारे विक्री केली जात असेल तर त्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. आज 12 जून रोजी मी मकोका (मोक्का) लावण्याचे आदेश पारित केले आहेत. यानुसार जे आदेश देण्यात आले आहेत, त्यात एक पेक्षा जास्त वेळा गुटखा बिझनेस करत आहेत त्याच्यावर माकोका लावण्यात येणार आहे. तसेच उत्पादन करणारे, उत्पादनाला पैसा पुरवणारे, ट्रान्सपोर्ट करणारे आणि एजंट, गोडाऊनवाले, होलसेल डीलर, रिटेल सेलर्स, अशा सर्वांवर माकोका लावण्यात येणार आहे. तसेच तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, या निर्देशांनुसार, प्रतिबंधित अन्नपदार्थांशी संबंधित प्रत्येक अंमलबजावणी कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी आणि नामनिर्देशित अधिकारी यांनी मकोका लागू होण्याची पात्रता तपासणे आवश्यक राहील. पात्रता सिद्ध झाल्यास संबंधित प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील लागू तरतुदींसह मकोका अंतर्गतही कारवाई करण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधला जाईल. मात्र, मकोका लागू करण्यासाठी अधिनियमाच्या कलम 23 अंतर्गत आवश्यक असलेली प्रक्रिया काटेकोरपणे पाळली जावी. संपूर्ण नेटवर्कवर कारवाईचा धोरणात्मक निर्णय नव्या निर्देशांनुसार, आता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यापुरते मर्यादित न राहता, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापारामागील संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याअंतर्गत उत्पादक, वित्तपुरवठादार (फायनान्सर), मुख्य पुरवठादार, वाहतूकदार, गोदाम मालक, घाऊक आणि किरकोळ विक्रेते या सर्वांचे नेटवर्क भक्कम पुराव्यांच्या आधारे उघड केले जाईल. जर हे प्रकरण संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपाचे असेल, तर उपलब्ध पुराव्यांनुसार या साखळीतील सर्व ज्ञात सदस्यांवर एकत्रित कठोर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले जाईल. या व्यापक दृष्टिकोनामुळे या अवैध व्यवसायातील मुख्य सूत्रधार आणि खरे आर्थिक लाभार्थी थेट कायद्याच्या कचाट्यात सापडण्यास मदत होणार आहे. प्रभावी नियंत्रणासाठी स्वतंत्र नोंदवही आणि अहवाल प्रणाली या कारवायांच्या प्रभावी पाठपुराव्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक स्वतंत्र ‘अभियोजन नोंदवही’ तयार केली जाईल. यामध्ये मकोका अंतर्गत पात्र प्रकरणे, दाखल झालेले एफआयआर, आरोपपत्रे, न्यायालयीन आदेश, जप्त केलेला मुद्देमाल, तपासाची सद्यस्थिती आणि प्रकरणाचा अंतिम निकाल यांच्या सविस्तर नोंदी ठेवल्या जातील. याशिवाय, राज्य पातळीवर मुख्यालयातही एक एकत्रित नोंदवही ठेवून या सर्व प्रकरणांवर नियमित देखरेख केली जाईल. तसेच, सहआयुक्त स्तरावर जिल्ह्यांच्या अहवालांचा आढावा घेऊन, दरमहा एक सविस्तर प्रादेशिक अहवाल थेट आयुक्तांना सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराची संघटित साखळी उद्ध्वस्त करणे आणि आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करून राज्यात बंदी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हा या संपूर्ण मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, परिसरात कुठेही गुटखा, तंबाखू, निकोटीनयुक्त पानमसाला किंवा तत्सम प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण अथवा विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याबाबतची माहिती त्वरित स्थानिक अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा जवळच्या पोलिस ठाण्याला द्यावी, जेणेकरून या बेकायदा व्यवसायांना कायमचा आळा घालता येईल, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *